पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला समृध्द बनविण्यासाठी पंतप्रधान जन-धन योजना सुरू केली आहे. या योजनेचा दुसरा टप्पा म्हणून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना सुरू केली असून या  योजना यशस्वी करण्यासाठी जोमाने प्रयत्न करा असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महालक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना या योजनांच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, मुंबईत गरिबांना घरे उपलबध करून देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असून कोल्हापूरमध्येही झोपडपट्टीतील लोकांना घरे देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. सामान्य माणसाला त्याच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या सुविधा प्राधान्याने देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सनी म्हणाले, अशा महत्त्वाकांक्षी योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. या विमा योजनेमुळे प्रत्येक कुटुंब सुरक्षित होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब माणसाला या योजनेचा लाभ होणार आहे. यावेळी बँक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक जी. बी. काकडे यांनी मनोगत व्यक्त केले.  
याप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार आदी मान्यवर या विमा योजनेत सहभागी झाले. तसेच यावेळी सहभागी झालेल्या विमा पॉलिसीधारकांना मान्यवरांच्या हस्ते पत्राचे व पासबुकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक आर. गणेशन यांनी प्रास्ताविक, तर अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक एम. जी. कुलकर्णी यांनी स्वागत केले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक शंतनु पेंडसे यांनी आभार मानले.