एकीकडे डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ मिळावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टर आंदोलन करत आहेत. कामावर रुजू होण्यासाठी डॉक्टरांनी सुरक्षेचे आश्वासन दिले जात आहे. हे होत असतानाच कोल्हापूरच्या एका डॉक्टरला क्षुल्लक कारणासाठी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर येथे वालावलकर ट्रस्टचे लक्ष्मी नारायण हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये कराड येथील रहिवासी रुग्णाला दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णाचे बिल कमी करा अशी मागणी डॉक्टरांकडे केली. तसेच, कराडचे एक गृहस्थ रफीक मुल्ला यांच्याशी फोनवर संवाद साधावा अशी विनंती त्यांनी डॉ. इकबाल पठाण यांना केली. पठाण यांनी रफीक मुल्ला यांच्याशी संवाद साधला. रुग्णाची फीस कमी करावी अशी विनंती त्यांनी केली. त्यांच्याशी संवाद संपल्यावर पठाण हे रुग्णाच्या नातेवाइकांशी बोलले आणि त्यांना म्हटले रुग्णाला तपासून त्याप्रमाणे आपण बिल ठरवू. असे ते म्हणाले आणि वॉर्डकडे निघून गेले.

डॉक्टरांनी आपली विनंती मान्य केली नाही असा गैरसमज त्या रुग्णांच्या नातेवाईकांचा झाला आणि त्यांनी पठाण यांचे म्हणणे न ऐकून घेता हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पठाण यांना मारहाण देखील केली. याबाबत रुग्णालयाने राजाराम पुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. याआधी, धुळ्याच्या डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केली. अपघातग्रस्त तरुणाला वाचवण्यात अपयश आल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली आणि रुग्णालयाची तोडफोड केली. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या. त्या निषेधार्थ डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारला. डॉक्टरांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था मिळाली पाहिजे अशी मागणी डॉक्टरांनी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वैद्यकीय व्यावसायिक संघटनांनी याचा निषेध केला आणि संप पुकारला. त्यांना त्वरित कामावर रूजू होण्याचे आवाहन करण्यात आले. आज मार्डाने आपला संप मागे घेतला आहे. त्याच वेळी कोल्हापूरच्या डॉक्टरांना मारहाण झाल्याने डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.