डॉक्टरांच्या ‘प्रिस्क्रिप्शन’शिवाय औषध विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सभागृहाला सांगितले. डॉक्टरांनी सूचविले नसल्यास औषधे ग्राहकांना देण्यात येऊ नये. त्यासंदर्भातील शासन निर्णय आहे. पुन्हा त्याबाबतचे निर्देश देण्यात येतील, असेही ते म्हणाले.
राज्यात बंदी असलेल्या औषधांची विक्री होत आहे, असा तारांकित प्रश्न कालिदास कोळंबकर, अस्लम शेख, संतोष टारफे, निर्मला गावित, अमिन पटेल यांनी उपस्थित केला होता. त्यावर उपस्थित झालेल्या पुरक प्रश्नाला उत्तर देताना बापट म्हणाले, डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय वारंवार औषधे विक्री करणाऱ्या विक्रत्यांवर बंदी घालण्यात येईल.  
पोलिसांच्या घरासाठी ५०० कोटींचे कर्ज
पोलिसांची घरे बांधण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची परवानगी पोलीस गृहनिर्माण महामंडळाला देण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या घरांच्या दुरुस्तीचे अधिकार बांधकाम विभागाकडून काढून पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडे देण्यात येणार आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती सभागृहाला दिली. पोलिसांच्या घराबाबत आपण खूप मागे पडलो आहेत. त्यामुळे या घरांसाठी एफएसआय वाढून देण्यात येईल. आवश्यक असल्यास बीओटी तत्त्वावर घरे बांधण्यात येतील. त्यासाठी ५०० रुपयांचे कर्ज महामंडळाला काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुलाबराव पाटील यांनी चोपडा (जि. जळगाव) शहरातील पोलीस निवासस्थानाच्या गैरसोयींबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.