पालकांनी मुलांवर आपल्या सुप्त इच्छा लादण्यापेक्षा त्यांना निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे; परंतु मध्यमवर्गीयांकडून तसे होताना दिसत नाही. उलट पालकांकडून मुलांच्या शैक्षणिक अपयशासाठी व्यवस्थेला दोष दिला जातो. तसे करण्यापेक्षा त्यांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले.
येथील शंकराचार्य संकुलात आयोजित भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत ‘आजच्या शिक्षणाची यत्ता कोणती?’ या विषयावर कुबेर बोलत होते. पालक आणि राजकीय व्यवस्था यांच्यामुळे सध्या शिक्षणाचा काळा कालखंड सुरू आहे. यामुळे सध्या देणगी, प्रवेश, शिक्षणसम्राट यांसारख्या व्याख्यांशी पालकांची ओळख होत आहे. आपल्याकडे दहावी म्हटले की, पालकांसमोर यक्षप्रश्न उभा राहतो. निकालानंतर तर घरातील परिस्थिती आणीबाणीसारखी असते. मात्र मुलांनी यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर त्यांच्यावर कोणताही शैक्षणिक दबाव आणू नये, त्यांना हव्या त्या विषयात शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, तरच ते शिक्षण आणि कामातील निखळ आनंद घेऊ शकतील. मुलांच्या अपयशासाठी मध्यमवर्गीय मानसिकता कारणीभूत ठरते.
पालक स्वत: काही करत नाहीत; परंतु मुलांच्या अपयशाचे खापर राजकीय व्यवस्थेवर फोडतात. शैक्षणिक साचलेपणातून बाहेर पडावे, अशी पालकांची मानसिकता नाही. काही चुकतेय हे मान्य करायला पालक तयार नाहीत. शिक्षण म्हणजे काय, प्रगती म्हणजे काय, गती म्हणजे काय, ही संकल्पना स्पष्ट नसल्याने गोंधळाची परिस्थिती आहे, असे कुबेर यांनी नमूद केले.
यशस्वी व्हायचे म्हणजे आपल्याला इंग्रजी यायला हवे असा बागुलबुवा उभा केला जातो. मुळात शिक्षण हे मातृभूमीत, मातृभाषेतच होणे महत्त्वाचे आहे. भाषा ही अडसर कधीच असू शकत नाही. आपल्याकडे सांस्कृतिक अर्धवटपणा आहे. त्यामुळे आधुनिकता ही विचाराने, कृतीने स्वीकारायला हवी.
पालकांच्या या अर्धवटपणामुळे मुलांची त्रिशंकूसारखी अवस्था झाली आहे. प्रत्येक मुलामध्ये काही तरी विशेष असते. पालकांना हे शोधता आले पाहिजे. अशा परिस्थितीत ‘यत्ता काय’ हा प्रश्न पालकांनी स्वत:लाच विचारण्याची वेळ आली आहे. शिक्षण सर्वस्व नसून जगण्याची विविध माध्यमे आपल्यासमोर आहेत, असे सांगत त्यांनी सचिन तेंडुलकर, ए. आर. रहमान यांची उदाहरणे दिली. प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे यांनी प्रारंभी कुबेर यांचा परिचय करून दिला.