कृष्णाकाठाला महापुराचा धोका वाढल्याने अलमट्टी धरणातील विसर्ग बुधवारी दुपटीने वाढविण्यात आला असून वारणेच्या चांदोली धरणाच्या सांडव्यावरून बुधवारी दुपारी १ वाजल्यापासून २३९० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने वारणा काठच्या लोकांना दक्षतेचा इषारा देण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री जोर ओसरल्यानंतर आज सकाळपासून धरण क्षेत्रात पुन्हा पावसाने संततधार हजेरी लावली आहे. कोयना, वारणा, धोम, कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणातील पाणी साठय़ाबरोबरच नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
सांगलीतील जलसंपदा विभागाच्या मंडळ कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी कोयना धरणातील पाणीसाठा ५९.४८ टीएमसी आणि चांदोलीतील २९.४८ टीएमसी झाला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३८ तर चांदोलीच्या पाणलोट क्षेत्रात ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून पावसाचा जोर वाढला आहे.
चांदोली धरणातून वीजनिर्मितीसाठी पायथ्यापासून १७५८ क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी सोडण्यात येत होते, त्यामध्ये आज सांडव्यावरून सोडण्यात येत असलेल्या २३९० क्युसेक्स प्रतिसेकंद वाढ झाल्याने नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे वारणा काठच्या लोकांना धोक्याचा इषारा देण्यात आला आहे.
कृष्णाकाठाला पुराचा धोका उत्पन्न झाल्याने अलमट्टी धरणातील विसर्ग बुधवारी सकाळपासून वाढविण्यात आला आहे. काल या धरणात १ लाख ५ हजार क्युसेक्स सेकंदाला आवक असताना अवघा ४२ हजार क्युसेक्स विसर्ग ठेवण्यात आला होता. त्यामुळे सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णाकाठाला पुराचा धोका निर्माण झाला होता. पुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग सकाळपासून १ लाख ८ हजार २५० क्युसेक्स सेकंदाला करण्यात आला असून त्यामुळे धरणातील पाणी पातळी ५१८.८० मीटरवरून ५१८.६२ मीटर झाली आहे. अलमट्टी धरणचर उच्चतम मर्यादा पातळी ५१९.६० मीटर असून धरण भरण्यास सव्वा तीन फूट पाणी पातळी कमी आहे.
आज सकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी नोंदला गेलेला पाऊस पुढीलप्रमाणे- सांगली द.७०, मिरज २, शिराळा १५, इस्लामपूर १०, पलूस १, तासगाव १, विटा १, कडेगाव ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.