महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार, तसेच त्यांच्यानंतर माजी गृह व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर गुटखा-तंबाखूमुळे जबर आघात व्हावा, ही अतिशय दु:खद बाब आहे. या पाश्र्वभूमीवर आर. आर. यांच्या स्मृती जागवताना आता तरी तंबाखूमुक्त महाराष्ट्राचा संकल्प सोडावा, असे कळकळीचे आवाहन प्रसिद्ध समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी राज्यकर्त्यांना केले.
आर. आर. ऊर्फ आबांच्या निधनाचे वृत्त आले तेव्हा अवघा महाराष्ट्र हळहळला. सर्वच राजकीय नेते, कार्यकर्ते, आबांच्या चाहत्यांना धक्काच बसला. डॉ. बंग त्या वेळी ‘शोधग्राम’ (जिल्हा गडचिरोली) येथे आपल्या निवासस्थानी होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या सक्तीच्या विश्रांतीवर आहेत. अनेक वर्षे गडचिरोलीचे पालकमंत्रिपद भूषवणाऱ्या आबांसोबत संवादभेटीतील आठवणींना उजाळा देताना डॉ. बंग यांनी ज्या कारणामुळे आबांना मुख कर्करोगाने गाठले, त्या कारणांची व त्या परिणामांची संयत शब्दांत जाणीव करून दिली.
आबांच्या भेटीतील काही प्रसंग सांगताना डॉ. बंग म्हणाले, की एकदा मी आमच्या दारू नियंत्रण आंदोलनासंदर्भात आबांना भेटायला गेलो, तेव्हा मुख्य विषयासह इतर बाबींवरील चर्चा झाल्यानंतर आबांची चुळबूळ, अस्वस्थता माझ्या नजरेतून सुटली नाही, मी त्यांना तसे विचारलेही. थोडा वेळ झाल्यानंतर आबांनी टेबलाचा ड्रॉवर उघडला. त्यातून तंबाखूची पुडी बाहेर काढून ‘डॉक्टर, काही केले तरी हे व्यसन सुटत नाही..’ असे सांगत चिमूटभर तंबाखू तोंडात टाकली. त्यामुळे त्यांना क्षणिक स्वास्थ्य लाभलेही; पण दुर्दैवाने याच तंबाखूने त्यांचा बळी घेतला. तंबाखू सुटावी, यासाठी डॉ. आनंद नाडकर्णीकडून त्यांनी उपचार करून घेतले, पण निकोटिनचे व्यसन असे की ९० टक्के लोक तंबाखू सोडण्याच्या बाबतीत अयशस्वी ठरतात.
आबांना आम्ही आमच्या तंबाखूमुक्त अभियानाच्या उद्घाटनासाठी एकदा बोलावले होते. त्या वेळी तोंडावर ते नाही म्हणाले नाहीत, पण कार्यक्रमाला आलेही नाहीत. त्यावरून मी समजून गेलो स्वत:ची तंबाखू सुटत नाही, असे असताना आपण या अभियानाचे उद्घाटन कसे करावे, असे त्यांच्या संवेदनशील मनाला वाटले असावे. स्वत: तंबाखू खात अशा अभियानाचे उद्घाटन करण्याइतका निर्ढावलेपणा आबांकडे नव्हता, असे निदान डॉ. बंग यांनी केले. आमचे दारूमुक्ती आंदोलन व त्या अनुषंगाने आम्ही केलेल्या मागण्यांचे आबांनी सदैव समर्थन केले. मंत्रिमंडळात ते आमचे ‘राजदूत’च बनले होते. एकदा मी त्यांना थेट विचारले, आबांनीच सांगितल्यानुसार त्यांचे वडील खूप मद्यपान करीत असत. आबा व त्यांच्या परिवाराने त्याचा खूप त्रास सहन केला होता. म्हणून त्यांनी दारूच्या बाबतीत सदैव राजकारणापलीकडची भूमिका घेतली.
वृत्तवाहिन्यांवरील बातम्या बघताना शरद पवारांकडे पाहून तंबाखूमुळे झालेला कर्करोग व उपचारांमुळे आलेले व्रण त्यांच्या तोंडावर स्पष्ट दिसत होते. त्याच्याखाली आर. आर. पाटील गेले, अशी पट्टी दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावर धावत होती. महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेत्यांवर तंबाखूमुळे असा आघात व्हावा, ही दु:खद बाब होय, अशी खंत डॉ. बंग यांनी व्यक्त केली.
आबांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘आर. आर. पाटील म्हणजे भांगेत उगवलेली तुळस होय’ असे वर्णन करून मी व ‘सर्च’ परिवाराने अत्यंत प्रामाणिक, नम्र नेता, स्वच्छ चारित्र्याचा राजकारणी आणि सदैव हवाहवासा वाटणारा मित्र गमावला, अशी भावना डॉ. बंग यांनी व्यक्त केली. आबांच्या अत्यंत साधेपणाची तुलना डॉ. बंग यांनी थेट लाल बहादूर शास्त्रींशी केली. त्यांच्या वागण्या-बोलण्यात प्राचार्य पी. बी. पाटील यांनी केलेले संस्कार स्पष्ट दिसत असत. प्रदीर्घ काळ सत्तेत-मंत्रिपदी राहिल्यावरही या माणसाने आपली पत्नी व मुलांना मुंबईतील बंगल्यावर न आणता गावातल्या घरात ठेवले. असे करणारे ते एकमेव मंत्री असावेत.
आबांनी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद निभावले. प्रसंगी लाल दिव्याची गाडी सोडून मोटारसायकलवरूनही फिरले. या भागाविषयी आबांची तळमळ आम्ही अगदी जवळून बघितली. पण माझे एक दु:खद निरीक्षण असे, की आबा आमच्या भागाच्या सर्वागीण विकासाच्या नाडय़ा मोकळय़ा करू शकले नाहीत. कारण त्या मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्या हातात होत्या. आबांचा स्वभावधर्म ‘दादागिरी’ करणारा नव्हता, त्यामुळे त्यांना ते जमले नसावे, असेही डॉ. बंग यांनी सांगितले.