विकसनशीलतेकडून विकसित देश म्हणून भारताची वाटचाल सुरू असून यामध्ये विद्यापीठांची भूमिका मोलाची ठरणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाचा दैनंदिन कारभारातील हस्तक्षेप कमी ठेवून विद्यापीठाची स्वायत्तता अबाधित ठेवू, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५७वा वर्धापनदिन तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी साजरा झाला. यानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा मान्यवरांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुलगुरू प्रो.  बी. ए. चोपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तावडे यांच्या हस्ते कृषी अर्थतज्ज्ञ डॉ. राम देशपांडे, तांदळाच्या विविध १० जातींचा शोध लावणारे संशोधक दादाजी खोब्रागडे, कृषितंत्रज्ञ तथा उद्योगपती बी. बी. ठोंबरे, बायोमेडिकल शास्त्रज्ञ तथा माजी कुलगुरू डॉ. रावसाहेब काळे, कवी ना. धों. महानोर आणि ज्येष्ठ पत्रकार बबन कांबळे या सहा जणांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठाच्या वतीने दिल्या गेलेल्या या जीवन गौरव पुरस्कारामुळे आणखी काम करण्याची ऊर्जा आमच्यात निर्माण झाली, असे मत या वेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी व्यक्त केले.
विनोद तावडे या वेळी म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणाऱ्या या विद्यापीठात आल्याचा मला मनस्वी आनंद झाला. या खात्याचे मंत्रिपद स्वीकारल्यापासून उच्च शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता व पारदर्शकता येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच शिक्षक व प्राध्यापकांची भरती केंद्रीय पद्धतीने सुरू करण्यात येईल. नवीन विद्यापीठ कायदा येत्या डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. यामध्ये अधिसभा व व्यवस्थापन परिषद ही निवडून आलेल्या सदस्यांची असावी, असा बदल करण्यात येईल. एक प्रकारे विद्यापीठाची स्वायत्तता अबाधित ठेवतानाच निवडून आलेल्या सदस्यांनाही लोकशाही पद्धतीने प्रतिनिधित्व मिळेल. या भाषणानंतर जवळपास अर्धा तास प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे म्हणाले, विद्यापीठाने गेल्या काही काळात गुणवत्ता व पायाभूत सुविधा विकसित करून देशातून १८ वा क्रमांक पटकाविला आहे. केंद्रीय विद्यापीठाचा मसुदा तयार असून येत्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल.