दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत सर्रास दारूविक्री सुरू असल्याचे बघून संतापलेल्या ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांनी महिला बचत गटाच्या महिलांना घेऊन अवैध दारूविक्रेत्याच्या घरावर छापा टाकून साडेचार लाखांची दारू पकडून दिली. यावेळी दारूविक्रेत्याला महिलांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, ही दारू चंद्रपुरातील मद्यसम्राटांची असल्याची माहिती समोर आली आहे. आता श्रमिक एल्गारच्या मदतीला खुद्द डॉ. मंदाकिनी आमटेच उतरल्या असून आता मुख्यमंत्री हा विषय किती गांभीर्याने हाताळतात, याकडे सर्वाचे लक्ष
लागले आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदी असली तरी तेथे खुलेआम अवैध दारूची विक्री सुरू असते. चंद्रपूर, छत्तीसगड व आंध्र प्रदेश येथून गडचिरोलीत दारू येते. गेल्या काही दिवसांपासून लोकबिरादरी प्रकल्प असलेल्या भामरागड व हेमलकसा परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू असल्याची कुणकुण ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांना लागली. त्यामुळे संतापलेल्या डॉ.मंदाकिनी आमटे यांनी दारूविक्रेत्यांविरुद्ध एल्गार पुकारून वॉर्ड क्रमांक एकमधील सिद्धम या दारूविक्रेत्याच्या घरावर बचत गटांच्या महिलांसह छापा टाकून साडेचार लाखाचा दारूसाठा जप्त करून त्याला पोलिसांच्या ताब्यातही दिले.