नागपुरातील नीरी ही माझी प्रयोगशाळा आहे आणि तब्बल तीन दशकानंतर या प्रयोगशाळेत परतत आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर घरी आल्यावर जो आनंद होतो तोच आनंद मी सध्या अनुभवत आहे, अशा विनम्र शब्दात ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिवं. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार स्वीकारला. पद्मविभूषणपेक्षाही मोहन धारियांच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्काराचा आनंद अधिक असल्याचे सांगून त्यांनी या पुरस्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
वनराई फाऊंडेशनच्यावतीने यावर्षीपासून दिवं. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्काराची घोषणा केली आणि या पहिल्याच पुरस्काराचे मानकरी डॉ. रघुनाथ माशेलकर ठरले. नीरीच्या सभागृहात हा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. माजी खासदार दत्ता मेघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहोळ्याला वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, अनंत घारड व्यासपीठावर होते.
भारताविषयीच्या जगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे. त्यामुळे संशोधकांनी व वैज्ञानिकांनी त्यांची दृष्टी बदलणे अतिशय गरजेचे आहे.
या संशोधन आणि विज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागात व्हायला हवा. संशोधन संस्थांनी शास्त्रशुद्ध खेडी निर्माण करायला हवी, अशी अपेक्षा यावेळी डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केली. गडकरींबाबत बोलतांना त्यांनी ‘आयकॉनिक नॅशनल लीडर इन ग्लोबल व्हीजन’ या शब्दात प्रशंसा केली. दिवं. डॉ. मोहन धारिया यांनी सदाहरित भारताचे स्वप्न पाहिले आणि तेच स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली, असे डॉ. माशेलकर म्हणाले.
यावेळी त्यांनी मिळालेल्या पुरस्काराचा रकमेत ५० हजार रुपयाची भर घालून दीड लाख रुपये मुंबई येथील इन्स्टिटय़ुट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला देऊ केले.काही पुरस्कारांनी पुरस्कर्त्यांचा बहुमान वाढतो, तर काही पुरस्कर्त्यांनी पुरस्काराची उंची वाढते. हा पुरस्कार स्वीकारून डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढविल्याचे गौरवोद्गार नितीन गडकरी यांनी काढले.