जागतिक कीर्तीचे समाजशास्त्रज्ञ, विविध सामाजिक संस्थांचे आधारवड आणि ‘केसरी’चे माजी संपादक डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले (वय ८७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव गोखले हे त्यांचे चिरंजीव होत. डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
शरच्चंद्र गोखले यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२५ रोजी पुण्यामध्ये झाला. केसरीचे माजी संपादक कै. बाबूराव गोखले हे त्यांचे वडील होते. गोखले यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेतून समाजशास्त्र विषयातील ‘मास्टर ऑफ सोशल वर्क्‍स’ ही पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागामध्ये संचालक म्हणून ते दीर्घ काळ होते. बनारस विद्यापीठातून डॉक्टरेट संपादन केली. बालकांसाठी ‘कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्राम’ (कास्प), कुष्ठपीडित नागरिकांसाठी इंटरनॅशनल लेप्रसी युनियन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र-भारत या तीन सामाजिक संस्थांची स्थापना केली.डॉ. शरच्चंद्र गोखले हे १९८७ ते १९९२ या कालावधीत केसरीचे संपादक होते.