राष्ट्रीय तण व्यवस्थापन कार्यशाळेत शास्त्रज्ञांचे मत
पिकातील तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिबकसारख्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत व प्रभावी असून याद्वारे तणांचे ७० टक्क्यांपर्यंत नियंत्रण होते. शेतकऱ्यांची एरवी तण व्यवस्थापनात होणारी दमछाक व खर्च टाळण्यासाठी ठिबक प्रणालीसाठी
पुढाकार घेण्याची गरज राष्ट्रीय तण व्यवस्थापनावरील वार्षिक आढावा बैठकीत झालेल्या विचारमंथनात शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. जैन हिल्स येथे आयोजित बैठकीचा शनिवारी समारोप झाला. शेतातील तणांचे नियंत्रण हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अत्यंत आवश्यक असा विषय मानला जातो. दरवर्षी कोटय़वधी रुपये तण नियंत्रणावर खर्च होतात. शेतीसोबत सर्वसामान्य लोकांना एलर्जी, त्वचारोगासारखे आजार तणांमुळे होतात. यावर सक्षम उपायासाठी राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद काम करत आहे. बैठकीचे उद्घाटन जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी व संशोधक डॉ. सुब्रमण्यम यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रीय तण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. ए. आर. शर्मा, राष्ट्रीय तण संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख उपस्थित होते. बैठकीत वैविध्यपूर्ण पीक पद्धतीत सुधारित शाश्वत तण व्यवस्थापन, तणाच्या वाढीची कारणे व बदलत्या हवामानानुसार तण व्यवस्थापनाचे उपाय आणि तणनाशकांचा प्रतिकार, जीवशास्त्र आणि पिकातील व पिकाबाहेरील तणांची समस्या आणि व्यवस्थापन, तणनाशकांचे अंश आणि पर्यावरणातील इतर प्रदूषण करणाऱ्या घटकांवर उपाययोजना, तण नियंत्रण तंत्राबद्दल थेट बांधावरचे संशोधन आणि त्याचा आढावा, तण व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर या विषयांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील शास्त्रज्ञांनी ठिबक सिंचनाच्या विविध तंत्रांची माहिती दिली.