तब्बल दोन महिन्यानंतर पावसाचे आगमन झाले, पण त्यात जोर नव्हता. बुधवारी दिवसभर श्रीरामपूर, नेवासे व राहुरी तालुक्यांत रिमझिम पाऊस पडत होता. उद्या गुरुवारी दिवसभर असाच पाऊस पडेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. मुळा व भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात दमदार पाऊस नसला तरी पाणलोट क्षेत्रात मात्र चांगला पाऊस पडत आहे.
छत्तीसगढ ते मध्य प्रदेशच्या भागात तसेच उत्तर महाराष्ट्र ते केरळच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. रात्री पावसाची रिमझिम सुरू झाली. दिवसभर हलका पाऊस पडत होता. ढगाळ हवामान होते. सूर्यदर्शन झाले नाही. हवामान खात्याने दि. ३१ पर्यंतचा नगर जिल्ह्याचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. उद्या गुरुवापर्यंत पावसाची अशीच रिमझिम सुरू राहील. त्यानंतर शुक्रवार व शनिवारी पाऊस उघडीप देणार आहे. सोमवार दि. २८ ते ३० च्या दरम्यान पुन्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पुढील पाच दिवस किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस असेल. आर्द्रता ८६ ते ९० व दुपारी ६६ ते ७१ असेल. वाऱ्याचा वेग ताशी १३ ते १७ किलोमीटर असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
तालुक्यात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : अशोकनगर- ५, उक्कलगाव- ७, पाचेगाव- ५, खानापूर- २, उंदीरगाव- ५, कमालपूर- ३, टाकळीभान- ४, वांगी- २, पढेगाव- ५, वडाळा महादेव- ३, राहुरी-९.