चालू रब्बी हंगामातील सुधारित पैसेवारीनुसार ५० पैसे वा त्यापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्य़ातील १३९१ गावांमध्ये टंचाईग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी जिल्ह्य़ातील १३९१ महसुली गावांना टंचाईग्रस्त घोषित केल्याचा आदेश नुकताच जारी केला.
या जिल्ह्य़ातील वरोरा तालुक्यातील १५६ गावे, पोंभूर्णा ३८, भद्रावती १००, राजूरा ५८, चिमूर १५४, सावली १०५, चंद्रपूर ३९, सावली ५८, बल्लारपूर ९, जिवती ७५, नागभीड १३५, ब्रम्हपुरी १३७, सिंदेवाही ११५, मूल ९९ व कोरपना तालुक्यातील ११३ गावे, अशी १५ तालुक्यातील १३९१ गावात टंचाईग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. टंचाईग्रस्त गावांना शासन निर्णयानुसार सवलती देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशाव्दारे दिल्या आहेत.
जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, वीज बिलात ३३.०५ टक्के सूट, दहावी-बारावी परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पुरविण्यासाठी टंॅकरचा वापर, टंचाईग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची जोडणी न करणे आदी सवलती देण्यात आल्या आहेत. टंचाईग्रस्त गावात देण्यात येणाऱ्या विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाने उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी संबंधित कार्यालयाने उपलब्ध करून द्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.