दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना हटकणाऱ्या पोलीसालाच रेल्वेतून बाहेर फेकण्याची धक्कादायक घटना रोह्याजवळील निडी स्टेशन जवळ घडली आहे. रामविलास यादव (वय २८) असे जखमी झालेल्या आरपीएफ जवानाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. रामविलास यादव हे दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. यावेळी गाडीत १२ ते १५ तरुण दारुच्या नशेत मोठमोठ्याने गोंधळ घालताना त्यांना आढळून आले. गोंधळ घालणाऱ्या मुलांना यादव यांनी हटकले आणि गोंधळ न घालण्याचा सल्ला दिला. पण तरुणांना याचा राग आला, त्यांना यादव यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. आणि रोहा ते निडी रेल्वे स्थानकादरम्यान यादव यांना चांलत्या गा़डीतून फेकून दिले. यात यादव गंभिरित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले.
या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, दारु पिऊन दंगा घालणे, लोकसेवकाला मारहाण करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक डी.डी.कदम या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.