वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांना टंचाईची झळ मोठय़ा प्रमाणात पोहोचली आहे. ४३ गावांतील ७९ वाडय़ांमध्ये टँकरची मागणी झाली होती. त्यानुसार ११ टँकर्सनी पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षीपेक्षा टँकरग्रस्त गावांची संख्या अधिक आहे. गतवर्षी ३७ गावांतील ६२ वाडय़ांमध्ये टँकर सुरू होता. उष्म्याचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात टँकरग्रस्त गावांमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या घटेल असा अंदाज होता; परंतु खेड तालुक्यात पहिला टँकर धावला. त्यानंतर चिपळूण, दापोली, संगमेश्वर, गुहागरमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली. सर्वात जास्त टंचाईग्रस्त वाडय़ा खेड तालुक्यात आहेत. वाढत्या उष्म्यामुळे नदी, नाले, छोटी धरणे कोरडी पडू लागली आहेत. सध्या पारा ३६ अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. त्यामुळे हवेत गर्मीही तेवढीच जाणवत आहे. त्याचा परिणाम भूगर्भातील पाणी पातळीवर झाला आहे. कातळावरील धनगरवाडय़ांना तर पाण्यासाठी दोन किमी पायपीट करावी लागत आहे. एकूण १६ धनगरवाडय़ा टंचाईग्रस्त आहेत.

tankwe-chart

पाच तालुक्यांतील ७९ वाडय़ांना ११ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. खेडमध्ये ३३ वाडय़ांसाठी २ खासगी आणि २ शासकीय टँकरचा उपयोग केला जातो. ही गावे तालुक्याच्या कानाकोपऱ्यात डोंगरावर वसलेली असल्याने त्यांना नियमित पाणी पुरविणे शक्य नाही. दोन दिवसाआड पाणी पुरविण्याशिवाय पर्याय नाही. पाण्याची मागणी वाढत असली तरीही टँकरची संख्या कमी आहे. खासगी टँकर अधिग्रहित करावे लागत आहेत. गतवर्षीप्रमाणेच टँकरचालकांची मनधरणी करून पाणी वापरावे लागत आहे. रत्नागिरी तालुक्यात सहा वाडय़ांमधून टँकरची मागणी आली आहे. त्यावर उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.