भगवानगडावरील दसरा मेळाव्यासाठी भगवान गड कृती समितीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निमंत्रण दिले आहे. भगवान गडावर पारंपरिक उत्सव साजरा होईल, मात्र कोणताही राजकीय मेळावा येथे होणार नाही, असे सांगत गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी दसरा मेळावा बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र, भगवान गड परिसरातील १०० ग्रामपंचायतींनी ठराव करुन पूर्वीप्रमाणेच भगवान गडावर दसरा मेळावा साजरा करण्याचे ठरविले आहे. नामदेव शास्त्री यांनी दसरा मेळाव्या संदर्भातील निर्णय बदलावा, अन्यथा गादी सोडावी असा पवित्रा कृती समितीने घेतला आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वाटचालीत महत्त्वाचा अध्याय ठरलेला भगवानगडावरील दसरा मेळावा बंद करण्याचा निर्णय या गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी घेतला होता.
या निर्णयानंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देखील नामदेव शास्त्री यांनी दिली होती. त्या आता राजकारणात स्थिरावल्या असून, स्वत:च्या पायावर सक्षमपणे वाटचाल करीत आहेत. त्यामुळेच भगवानगडावरील दसऱ्याचा राजकीय मेळावा आता बंद करण्यात येत आहे. येथे होणाऱ्या पारंपरिक धार्मिक उत्सवास सर्वधर्मीय बांधव उपस्थित रहावे, असा प्रयत्न आहे, असेही नामदेव शास्त्री यांनी म्हटले होते.
गोपीनाथ मुंडे भगवान गडावरील मेळाव्याच्या निमित्ताने भाजपसह अन्य पक्षातील दिग्गज नेत्यांना भगवानगडावर आणून वेगळी राजकीय मोर्चेबांधणी करत होते. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनीही गडावरील दसऱ्याच्या राजकीय मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवली होती.