मराठी भाषेच्या अनुषंगाने निर्मित ३६ परिभाषा कोश, शब्दावली, कार्यरूप व्याकरण, भारताचे संविधान, कार्यदर्शिका अशी अनेक पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकतील, अशी व्यवस्था केली जात आहे. भाषा संचालनालयाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या ३६ पुस्तकांचे ई-बुक तयार करण्याचे काम ‘सी-डॅक’ मार्फत सुरू करण्यात आले आहे. ही पुस्तके एका क्लिकवर केव्हा उपलब्ध होतील, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. भाषा संचालनालयातील अधिकाऱ्यांनाही याची माहिती नाही. विभागाच्या उपसचिवांकडेही याचे वेळापत्रक अजून आले नाही. मात्र, या अनुषंगाने माहिती-तंत्रज्ञान विभागाने तरतूद केली असल्याने लवकरच ही पुस्तके संगणकावर पाहायला मिळू शकतील.
सरकारी कामात व न्यायालयीन प्रकरणांमध्ये मराठी भाषेचा वापर अधिकाधिक व्हावा, म्हणून ई-बुकचे प्रयोजन केले होते. ‘नवी दिल्लीहून पाठविलेले मुख्यमंत्री’ अशी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘त्यांना मराठी तरी येते का’ असा सवाल केला होता. त्यानंतर भाषाविषयक विविध प्रकारचे उपक्रम हाती घेता येऊ शकतात, हे दाखवून देण्यासाठी भाषा संचालनालयाच्या वतीने ई-बुकचा प्रस्ताव ठेवण्यात आला. याच अनुषंगाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात आला. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अभिजात मराठीचा प्रारूप अहवाल तयार केला. या मसुद्यावर अंतिम हात फिरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, ई-बुक निर्मितीच्या प्रक्रियेलाही गती मिळाली आहे.
भाषा संचालनालयाच्या वतीने या पूर्वी ३६ परिभाषा कोश प्रकाशित केले आहेत. व्याकरणातील एखादी गोष्ट अडली तर राज्य सरकारचा अधिकृत अभिप्राय असणारे पुस्तक म्हणून कार्यरूप व्याकरणाकडे पाहिले जाते. तसेच दैनंदिन व्यवहारात सरकारी अधिकारी जी इंग्रजी भाषा वापरतात, त्याला मराठीत शब्दरचना कशी असावी, या विषयीची कार्यदर्शिकाही काढण्यात आली. एखाद्या फाइलला ‘प्लीज पुटअप’ असे सर्रास लिहिले जाते. त्याला मराठी शब्द कोणता, हे अधिकाऱ्यांनाही समजावे यासाठी काढलेल्या कार्यदर्शिकेचा अलीकडे अधिकारी उपयोगच करीत नव्हते. परिभाषा कोश, कार्यदर्शिका, राजभाषा परिचय, कार्यरूप व्याकरण, उप परिभाषा कोश, प्रमाण लेखन नियमावली, वित्तीय शब्दावली अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली गेली. मात्र, ती सहज उपलब्ध नसल्याने त्याचा वापर फारसा होत नाही. यावर उपाय म्हणून या पुस्तकांचे ई-बुक करण्याचे ठरविण्यात आले. ४६ पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध व्हावीत, यासाठी ती ‘सी-डॅक’ संस्थेकडे वर्ग करण्यात आली आहे. मात्र, हे काम कधी होईल, याची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. या अनुषंगाने सी-डॅक संस्थेशी संपर्क साधला असता काम कधी पूर्ण होईल, हे सांगता येणार नाही. या विषयीची माहिती मंत्रालयातूनच घेतली तर बरे, असे सांगण्यात आले. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही हे काम कधीपर्यंत पूर्ण करायचे, याची माहिती नाही. या अनुषंगाने भाषा संचालनालयाच्या उपसचिव श्रीमती उपासनी यांनी, ‘हे काम माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून केले जात आहे. त्यामुळे ते कधीपर्यंत पूर्ण होईल, हे लगेच सांगता येणार नाही,’ असे नमूद केले.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला