राज्य सरकारच्या इ-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत नगरपालिकेने संकेतस्थळ सुरु केले आहे. नागरिकांना कराचा भरणा व तक्रारी ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहेत. पाािलकेने राज्यात सर्वप्रथम अशी सुविधा दिल्याचा दावा नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांनी केला आहे.
मुख्याधिकारी संतोष खांडेकर व संगणक अभियंता अभिजीत गोंधळी यांनी हे संकेतस्थळ सुरु केले आहे. संकेतस्थळावर जन्म व मृत्यूच्या नोंदी असणार असून त्याची तपासणी ते करु शकतील. तसेच घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकीची माहिती त्यांना मिळेल. ऑनलाईन पध्दतीने कराचा भरणा करण्याची सुविधाही आहे. आरोग्य, पाणीपुरवठा याबद्दल संकेतस्थळावर तक्रारी नोंदविता येतील. त्याची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल असे ससाणे यांनी सांगितले.
संकेतस्थळावर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांची माहिती तसेच शहराचा नकाशा, शहराची माहिती, सुरु असलेले प्रकल्प याची माहितीही असेल. नागरिकांच्या सूचना, तक्रारी याची दखल घेऊन ५ दिवसाच्या आत कार्यवाही केली जाईल. या कार्यवाहीची माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाईल. नागरिकांच्या अडचणी नोंदवून घेण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात येईल, त्याआधारे तक्रारीही करता येतील. या संगणकस्थळामुळे पालिकेचा कारभार पारदर्शी व लोकाभिमूख बनेल असा विश्वास ससाणे यांनी व्यक्त केला.