माणसाकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षा या गुलामगिरीचे प्रतीक मानल्या जात असल्याने देशभरात या रिक्षा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र वाहनांवर बंदी असल्याचे कारण पुढे करत रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षांचा अमानुष प्रकार आजही सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन माथेरानमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिक्षा संघटनांनी यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.

माथेरान हे पर्यावरणीय दृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जात असल्याने येथे वाहन वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे घोडे आणि माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षा ही माथेरानच्या दळणवळणाची प्रमुख संसाधने म्हणून आहेत. मध्यमयुगीन कालखंडातील वाहतुकीची संसाधने म्हणून ही दोन्ही माध्यमे ओळखली जातात. यांत्रिकीकरणानंतर ही वाहतूक साधने कालबा’ा झाली.

मात्र पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली आजही माथेरानमध्ये या दोन मध्यमयुगीन कालखंडातील वाहतूक साधनांचा आजही वापर केला जात आहे. माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने ही वाहतूक साधने आता अडसर ठरायला लागली आहे. माथेरानमध्ये जवळपास ४०० प्रवासी आणि २०० मालवाहतूक करणारे घोडे आहेत. या घोडय़ांची लीद-मूत्र माथेरानसाठी मोठी समस्या बनली आहे. दुसरीकडे घोडे उधळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ लागले आहेत. घोडय़ावरून पडल्याने माथेरानमध्ये गेल्या पाच वर्षांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे माथेरानमध्ये माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या ९२ रिक्षा कार्यरत आहेत. ब्रिटिश राजवटीत माथेरानमध्ये गुलामगिरीचे प्रतीक म्हणून या रिक्षा सुरू करण्यात आल्या होत्या. कालांतराने या रिक्षा येथील वाहतुकीचे साधन म्हणून कायम राहिल्या.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही माथेरानमध्ये माणसांनी ओढल्या जाणाऱ्या रिक्षांची अमानुष प्रथा कायम राहिली. निमित्त ठरले ते माथेरानमध्ये घालण्यात आलेल्या वाहन बंदीचे. एक चालक आणि एक ते दोन सहकारी यांच्या मदतीने आजही माणसांनी ओढणाऱ्या रिक्षांची प्रथा कायम आहे.

माथेरानमधील माणसांकडून ओढल्या जाणाऱ्या रिक्षांची पद्धदत बंद करून त्याऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या ई-रिक्षा सुरू करावी अशी आमची मागणी आहे.ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटकांची होणारी पायपीट यामुळे टळू शकेल आणि पर्यटकांना किफायतशीर दरात प्रदूषणमुक्त प्रवासाचा पर्यायही उपलब्ध होऊ शकेल.

‘शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती यांची वाहतुकीची संसाधने उपलब्ध नसल्याने चांगलीच कुचंबणा होते. गेली अनेक वर्षे माथेरानकर यासाठी पाठपुरावा करत आहेत. संनियंत्रण समितीने नुकताच याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. पर्यावरण विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन माथेरानकरांची जाचक प्रथेतून मुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे’. 

 सुनील शिंदे, सचिव श्रमिक हाथ रिक्षा 

ई रिक्षाचे फायदे

– विद्यार्थ्यांची पायपीट संपेल,

– जेष्ठ नागरिक, महिलांची सोय

-पर्यटकांचा ओघ वाढेल

-पर्यटन व्यवसायाला चालना

-पर्याकरणाचे रक्षण होईल