अर्थसंकल्पात आदिवासी विकासासाठी कोटय़वधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. अनेक योजना राबविल्या जातात; परंतु प्रशासनाकडून त्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने जिल्हय़ातील आदिवासी कातकरी समाज सुविधांपासून वंचित राहिला आहे. याची खंत व्यक्त करीत आदिवासी समाजात शिक्षणाचा मोठय़ा प्रमाणात अभाव आहे. आपल्या आदिवासी समाजाची प्रगती ही शिक्षणानेच होईल, असे मत राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केले. रायगड जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटनेच्या वतीने अलिबाग तालुक्यातील सहाण येथील श्रीगणेश मंगल कार्यालयाच्या सभागृहात आदिवासी कातकरी जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. त्या वेळी नील किरीट सोमय्या, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, भाजप तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, अलिबागचे उपविभागीय अधिकारी विश्वनाथ वेटकोळी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे, अलिबागचे तहसीलदार प्रकाश संकपाळ, जनशिक्षण संस्था अलिबागचे डॉ. गांधी, रायगड जिल्हा आदिवासी कातकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान नाईक, कार्याध्यक्ष अनंता वाघमारे, सागर नाईक, जयवंत आंबाजी, पंचायत समिती सदस्य काठे, संतोष वाघमारे, सहाणच्या सरपंच लहानी नाईक, रेखा वाघमारे, भाग्यश्री आठवले, संकेत जोशी, महेंद्र चौलकर, मुकेश नाईक आदी मान्यवर पदाधिकारी, जिल्हय़ातील सर्व आदिवासी समाज मोठय़ा संख्येने उपस्थित होते.