शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य विक्रीस बंदी असताना नियमांचे उल्लंघन करुन साहित्य विक्री करणाऱ्या जळगावमधील एका शाळेवर कारवाई करण्यात आली. शहरातील पद्मावती नथमल लुंकड कन्या शाळेत साहित्य विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षणाधिकार्‍यांनी शुक्रवारी कारवाई केली. यावेळी प्रयोगशाळेत विक्रीसाठी ठेवलेले दोन लाखांचे शैक्षणिक साहित्य सील करण्यात आले. शासन निर्णयानुसार कोणत्याही खासगी अथवा शासकीय शाळेत शैक्षणिक साहित्य विक्री करण्यास बंदी आहे. मात्र बहुतांश शाळांमध्ये शालेय साहित्याची विक्री केली जाते. त्याचा आर्थिक भुर्दंड पालकांना सोसावा लागतो. या विरोधात तक्रारीसाठी पालक पुढे येत नसल्याने शाळांवर कारवाई होत नाही. परंतू केवळ एका निनावी फोनवरुन आलेल्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी एका मोठ्या संस्थेच्या शाळेवर कारवाई करण्याचे धाडस दाखविले.

रिंग रोड परिसरातील पदद्मावती नथमल लुंकड कन्या शाळेत शुक्रवारी ५ वी ते ८ वीसह १० वीचे शैक्षणिक साहित्य विक्रीसाठी ठेवल्याची माहिती महाजन यांना सकाळी निनावी फोनवरुन समजली. या माहितीच्या आधारे त्यांनी विस्तार अधिकारी बळीराम धाडी यांच्यासह सकाळी ९ वाजता शाळेची तपासणी केली. यावेळी शाळेच्या प्रयोगशाळेत शैक्षणिक साहित्य विक्रीस ठेवल्याचे समोर आले. याप्रकरणी जिल्हाशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रयोग शाळेचे दालन सील करण्याचे आदेश दिले. या कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण करून प्रयोगशाळा सील करण्यात आली. महाजन यांनी वर्गातील काही मुलींकडून या शैक्षणिक साहित्य विक्रीबाबत जबाब घेतले. आपण शालेय साहित्य शाळेतुनच खरेदी केले असून शाळेने आम्हाला बंधणकारक केले होते, असे मुलींनी सांगितले. या मुलींच्या जबाबाचे देखील चित्रीकरण करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी सांगितले. शालेय साहित्य विक्रीस उपलब्ध करून ५ वी ते आठवीच्या मुलींना शैक्षणिक साहित्य १६० रूपयात तर १० वीच्या मुलींना ३६० रूपयात उपलब्ध करून देण्यात येत होते.शालेय साहित्य विक्री प्रकरणी शिक्षणाधिकार्‍यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका भालेराव यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. खुलासा सादर केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. तोपर्यंत शाळेच्या प्रयोगशाळेचे दालन सील राहणार असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.