शिक्षणाधिकारी कार्यालयात चकाटय़ा पिटणाऱ्या शिक्षकोंना आवरण्याची तंबी शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व मुख्याध्यापकांना कडक शब्दात दिली आहे.
शिक्षक व कथित शिक्षक नेते हा शालेय व्यवस्थापनात चांगलाच टिंगलवजा चर्चेचा विषय झाला आहे. शिक्षणहक्क कायद्यान्वये शाळेत साडेपाच तासाची हजेरी आवश्यक असतांना ज्येष्ठ शिक्षक गैरहजर राहण्याचा प्रकार सर्रास घडत आहे. काही शिक्षकांनी तर शालेय कामे प्रशासनाकडून करून देण्याची सुपारी घेणेच आरंभले, तर काही शिक्षक लेआऊट व अन्य स्वरूपाचा धंदा करीत ग्राहकांना शाळेतच बोलवित देवाणघेवाण करीत असल्याचे पाहायला मिळते. तक्रारी घेऊन येणाऱ्या पालक किंवा विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षक कदाचितच भेटू शकतो. असे हे शिक्षक शिक्षणाधिकारी कार्यालयात मात्र हमखास आढळतात.
शाळेचे, संस्थेचे किंवा मित्राचे काम घेऊन आल्याचे ते सांगतात. एकदाच नव्हे, तर महिन्यातून दहा-बारा वेळा या शिक्षकांच्या फे ऱ्या झडतात. शिक्षणाधिकारी कार्यालयात कर्मचारी कमी व शिक्षकांचीच उपस्थिती जास्त दिसून येत असल्याचे चित्र आहे. संबंधित लिपिकाशी गप्पा मारत हे शिक्षक प्रशासनाचा खोळंबा करीत असल्याने वरिष्ठ अधिकारीही त्रस्त झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी जिल्ह्य़ातील मुख्याध्यापकांची एक विशेष बैठकच घेतली. 

थेट शिक्षणाधिकाऱ्यांकडे येणाऱ्या शिक्षकांना जरा आवरा, त्यांची शाळेतील पूर्णवेळ उपस्थिती तपासा, न ऐकणाऱ्यांवर कारवाई करा. उठसूठ कार्यालयात येणाऱ्या शिक्षकांना तंबी द्या. मुख्याध्यापकांची परवानगी असल्याचे पत्र देऊनच पाठवा. निर्णयाची अंमलबजावणी करायची की शाळेतील तंटे शिक्षणाधिकाऱ्यांनी सोडवायचे? मग मुख्याध्यापक पद काय कामाचे, अशा शब्दात शिक्षणाधिकाऱ्यांनी खडसावले. त्याचा काय परिणाम होतो, ते पुढे दिसेलच.
मात्र, मुख्याध्यापक संघटनेच्या एका जिल्हा नेत्याने स्पष्ट केले की, सध्या संच निर्धारणाचे काम सुरू असल्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले जाते, पण नव्या ठिकाणी रुजू करून घेतले जात नाही. समायोजनाचे प्रश्न सुटत नाही. त्यामुळे कार्यालयाकडे शिक्षक धाव घेतात. उगीचच नाही. त्यांच्या मते जे ठिय्या देणारे चार-पाच शिक्षक असतील त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीसा द्याव्या, अशी भूमिका मांडली, तर शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर म्हणाले की, शिक्षकांना ज्या कामासाठी नेमले ते काम त्यांनी करायलाच हवे. त्यात चुकारपणा होत असेल तर मुख्याध्यापकांनी लक्ष घालावे, असे माझे म्हणणे आहे. मात्र, अशा शिक्षकांबाबत मी आढावाच घेणार आहे. ज्येष्ठ शिक्षकांच्या दबाबतंत्रामुळे घायकुतीस येणारे शिक्षणाधिकारी कार्यालय आता यापुढे तरी मोकळे झालेले दिसण्याची अपेक्षा व्यक्त होते. व्यवस्थापन किंवा मुख्याध्यापकांना न जुमानणाऱ्या शिक्षकवर्गाचा यानिमित्याने वर्ग घेतल्या गेल्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहे.