स्वाईन फ्लूबाबत जिल्ह्य़ात दक्षता म्हणून खबरदारी घेतली जात आहे, जिल्हा रुग्णालय, महापालिकेचा नगर शहराच्या नवी पेठेतील दवाखाना येथे संशयितांच्या तपासणीसाठी कक्ष सुरू करण्यात आला आहे, तसेच जिल्हा रुग्णालयासह विविध खासगी रुग्णालये, शिर्डीचे साईबाबा रुग्णालय, प्रवरा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी कक्ष सुरू करण्यात आले आहेत, या रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. कवडे यांनी आज अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद क्षेत्रातील डॉक्टरांची बैठक घेऊन चर्चा केली. जानेवारीपासून जिल्ह्य़ात तीन रुग्ण दगावले आहेत तर १७० संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील विविध ठिकाणी स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळत असले तरी नगरमधील नागरिकांनी भीती बाळगू नये, पसरवू नये मात्र लागण टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्वाईन फ्लूसाठीच्या उपचारावरील टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा नगरमध्ये उपलब्ध आहे, या गोळ्या मोफत देण्याची सुविधा जिल्हा रुग्णालय, मनपाचा नवी पेठेतील दवाखाना व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करण्यात आली आहे. पाच वर्षांखांलील मुले, गर्भवती महिला, वृद्ध यांना लागण होण्याची शक्यता अधिक असल्याने अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लागण झाली नसताना रुग्णांनी भीती बाळगून विनाकारण टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे सेवन करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
श्रीगोंदे तालुक्यातील दोन व नगर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाल्याने संबंधित कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, मास्क लावावा, खोकताना, शिंकताना तोंडाला नाकाला रुमाल लावावा, हात वारंवार साबण व पाण्याने धुवावेत, सार्वजनिक ठिकाणी वस्तूंना स्पर्श टाळावा, भरपूर पाणी प्यावे आदी सूचना करण्यात आल्या आहेत.
तिन्ही पद्धतीत उपचार
स्वाईन फ्लूसाठी अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद अशा सर्वच पद्धतीमध्ये उपचार होऊ शकतात, असे संबंधित डॉक्टर एस. एस. दीपक, डॉ.पवार व वैद्य प्रभाकर पवार यांनी स्पष्ट केले. या तीनही उपचार पद्धती एकाच वेळीही होऊ शकतात, असेही त्यांनी निदर्शनास आणले.