महाबळेश्वर येथे एका दिवसात आठ इंच पाऊस झाला. आज दिवसभर पाचगणी, वाई, मांढरदेव, जावली खो-यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. वेण्णा लेक मात्र पुढील दोनतीन दिवसांत भरून वाहील.
विलंबाने पाऊस सुरू झाल्याने लांबलेल्या पेरण्या काही भागांत सुरू झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. या वर्षी पावसाचे अस्तित्व नेहमीप्रमाणे जाणवत नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात मात्र पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या पातळीत आठ फुटांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. बलकवडी व धोम धरणाच्या परिसरात पाऊस अगदीच नगण्य आहे. या पावसाने जळणा-या भाताच्या रोपांना जीवदान मिळाले. पाचगणीत पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे वीजवाहक तारा व खांब पडल्याने काही भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला.
महाबळेश्वर येथे मात्र आठ इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वरला पाणीपुरवठा करणारा वेण्णा लेक भरत आला आहे. साता-याचा कास तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. महामार्ग परिसरात आजही पावसाने म्हणावे अशी हजेरी लावलेली नाही त्यामुळे एकूणच चिंतेचे वातावरण आहे.