महाआरोग्य शिबिरासह अन्य कार्यक्रमासाठी शनिवारी जळगावमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांचा दौरा वेगळ्याच कारणांनी चर्चेत राहिला. महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमास भाजपचे अर्धा डझन मंत्रीही सहभागी झाले असले तरी महसूलमंत्री तथा जळगावचे पालकमंत्री एकनाथ खडसे मात्र अनुपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी आपल्या भाषणात खडसे यांचा नामोल्लेखही केला नाही. तडीपारीची नोटीस मिळालेल्या मनसे नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या शिबिराच्या निमित्ताने स्थानिक पातळीवरील खडसे विरोधकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न महाजन यांनी केल्याचे अधोरेखीत झाले.
महाजन यांच्या पुढाकाराने खान्देश सेंट्रल मॉल येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.
खडसे यांच्यावर सातत्याने टीका करणारे शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांना व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली.