राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेल भरो आंदोलनात अजित पवार आणि सुनील तटकरे सहभागी झालेले नाहीत, याबद्दल आपल्याला खंत वाटते. जेल भरो आंदोलन करून तुरुंगात जाण्यापेक्षा अधिकृतपणे तुरुंगात जाणेच त्यांना संयुक्तिक वाटले असावे. म्हणूनच ते आजच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत, असा टोला राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेल भरो आंदोलनाचीही त्यांनी खिल्ली उडविली.
राष्ट्रवादीकडून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात सोमवारी जेल भरो आंदोलन करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे विविध नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रमुख नेते अजित पवार हे या आंदोलनासाठी उपस्थित नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावरूनच खडसे यांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार आणि सुनील तटकरे यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. त्यामुळे जेल भरो आंदोलनातून तुरुंगात जाण्यापेक्षा अधिकृतपणेच तुरुंगात जाणे त्यांना अधिक संयुक्तिक वाटले असेल. त्यामुळेच त्यांनी या आंदोलनाला अनुपस्थित राहण्याचे पसंद केले असेल, असे खडसे म्हणाले.