आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील न झालेल्या कामांची लाखोची देयके वास्तुविशारद म्हणून हरिश खडसे यांनी साक्षांकित केल्याची बाब आता पोलिसांकडे झालेल्या तक्रारीतून उघड झाली आहे. राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जळगाव जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमधील कामेही त्यांचे बंधू व पुतणे यांचीच कंपनी बघत होती, हेही आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या गैरव्यवहाराच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केली.
आकोट बाजार समितीत गेल्या वर्षभरात एकूण तीन कोटींची कामे करण्यात आली. यासाठी अग्रवाल नावाचा कंत्राटदार नेमण्यात आला होता. हरिश खडसे पणन मंडळांच्या तांत्रिक सेवा पॅनलवर असल्याने या कामांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी देखरेख न ठेवता गैरव्यवहाराला उत्तेजन दिल्याचे पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीत नमूद आहे. या बाजार समितीत कंत्राटदाराने ८० लाख रुपयांचे काम केलेच नाही, असे त्रयस्थ संस्था म्हणून अमरावतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत ही बाब स्पष्ट झाली. तरीही या न झालेल्या कामाचे देयक साक्षांकित करून ते कंत्राटदाराला देण्यात यावे, असे खडसे यांनी बाजार समितीला सांगितले. याच बाजार समितीत ३५ लाखांचे लिलावगृह, २५ लाखांचे रस्ते व ३ लाखांची सांडपाणी वाहून नेणारी नाली कंत्राटदाराने बांधली. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे, असा अहवाल महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीने दिला आहे. या कामाची देयकेही खडसे यांनी साक्षांकित केली.
महाविद्यालयाच्या तज्ज्ञ समितीने जेव्हा कामाची पाहणी केली तेव्हा खडसे व कंत्राटदारांना वारंवार बोलावण्यात आले, पण ते हजर झाले नाहीत. यानंतर समितीच्या सचिवांनी आकोट पोलिस ठाण्यात तक्रार
दिली. यावरून पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. अखेर बुधवारी अकोल्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना ही तक्रार देण्यात आली.
राजकीय दबावामुळे पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हरिश खडसे व त्यांच्या वडिलांनी यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असा दावा ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. ‘समितीचे सचिव जाणीवपूर्वक बदनामी करीत आहेत,’ असे ते म्हणाले. पणन मंडळाच्या पॅनलवर असलेले हरिश खडसे यांच्याकडे जळगाव जिल्ह्य़ातील अनेक बाजार समित्यांची कामे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हा जिल्हा मंत्री एकनाथ खडसे यांचे प्रभावक्षेत्र म्हणून ओळखला जातो. हा योगायोग निश्चित नाही, असा टोला या मुद्यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी लगावला. बहिष्कारामुळे विधिमंडळात बुधवारी हा प्रश्न मांडता आला नाही, पण या मुद्याचा नक्की पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही, असे सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता खडसेंच्या बाबतीत कोणती भूमिका घेणार, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.