शिवसेना सत्तेत असूनही अनेक प्रश्नांवर दुहेरी भूमिका घेत आहे. हे चुकीचे असून या संदर्भात चर्चा करून योग्य पद्धतीने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राच्या जमीन अधिग्रहण कायद्याबद्दलही त्यांचे समज-गैरसमज दूर करण्यात येतील, असे महसुलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभानंतर महसुलमंत्री खडसे बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना व भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. असे असूनही शिवसेना बाहेर अनेक निर्णयांवर टीका करते. अशा प्रकारे चर्चा करणे योग्य नाही. त्यासंबंधी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
राज्यात गृह व कृषी खात्यांना स्वतंत्र मंत्री नेमावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे; पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात स्वतंत्र पूर्णवेळ मंत्री असूनही त्यांना लोकांचे प्रश्न सोडविण्यात अपयश आले. आता सत्तांतरानंतर त्यांना साक्षात्कार झाला आहे, अशी उपरोधिक टीकाही खडसे यांनी केली.
भ्रष्टाचार रोखणार
 सातबाराचा उतारा, फेरफार नोंदी करण्यासाठी पैसे मागितले जातात असे आढळून आले. हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी महसूल खात्याने उपाययोजना केली आहे. ऑनलाइन सातबारा व ई-धरती हा उपक्रम त्यासाठीच आहे. या महिनाअखेरीपर्यंत सातबाराचा उतारा ऑनलाइन पद्धतीने दिला जाईल. ई-फेरफारमध्ये दुय्यम निबंधकाकडे खरेदीखत नोंदविले, की त्याची नोंद तलाठय़ाकडे ऑनलाइन पद्धतीने लागेल.