मुंबई-गोवा महामार्गाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम ३ सप्टेंबपर्यंत पूर्ण करावे, असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिले. शिंदे यांनी या महामार्गाची पाहणी केली. गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजविले नाहीत, तर ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही शिंदे यांनी या वेळी दिले.

मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमय झाला असून, या मार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहतूक कोंडीही होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या पाश्र्वभूमीवर शिंदे यांनी शनिवारी महामार्गावर पळस्पे ते इंदापूर अशी पाहणी केली. या वेळी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते. महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवून मार्ग वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. महामार्ग दुरुस्तीसाठी पनवेल ते इंदापूरदरम्यान ९ ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली असून, या ठेकेदारांनी आतापर्यंत केलेले काम समाधानकारक नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत ३ सप्टेंबपर्यंत महामार्ग दुरुस्तीचे काम पूर्ण करा, अन्यथा संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला. प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केल्यास टोलमाफी मिळण्याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पळस्पे ते इंदापूर मार्गाचे चौपदरीकरण गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. मात्र, महामार्ग रुंदीकरणातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे येत्या ऑक्टोबरपासून उर्वरित कामाला गती मिळेल, असा आशावाद शिंदे यांनी व्यक्त केला.

ठेकेदारांकडून दिखावा

गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी महामार्गाची पाहणी करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आज सकाळपासून महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. भर पावसात डांबर टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. वडखळ ते खारपाडादरम्यान ठिकठिकाणी कामगार रस्त्यावरील खड्डय़ात साचलेले पाणी काढून त्यात खडी भरण्याचे प्रयत्न करत होते. काही ठिकाणी रोलर, डंपर, जेसीबी आणि रस्त्याचे डांबरीकरण करणारे मशीन रस्त्यात उभे करून काम सुरू असल्याचा आभास निर्माण करण्यात आला.