लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांतील बॅलेट मशिन्स (एव्हीएम मशिन्स) कडेकोट बंदोबस्तामध्ये शुक्रवारी शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीसी टीव्हीची जागती नजर असणार आहे. याच ठिकाणी १६ मे रोजी उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाल्याने मतांचा टक्काही काही प्रमाणात वाढला आहे. काही केंद्रांवर तर रात्री सात ते आठ वाजेपर्यंतही मतदान झाल्याचे सांगण्यात येते. या पाश्र्वभूमीवर खेडय़ापाडय़ातून बॅलेट मशिन्स जिल्ह्य़ाच्या ठिकाणी येण्यास गुरुवारी रात्री काहीसा विलंब झाला होता. शुक्रवारी या सर्व बॅलेट मशिन्स शिवाजी विद्यापीठाजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आल्या. तीन मजल्यांच्या या इमारतीला आता स्ट्राँग रूमचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मशिन्सना कोणताही उपद्रव होऊ नये याची सर्वतोपरी दक्षता जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने घेतलेली आहे. राजपत्रित अधिकाऱ्याच्या नजरेखाली सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे. पोलीस, होमगार्ड, सुरक्षादल यांचे अधिकारी व शिपाई यांचा चोवीस तास सशस्त्र पहारा या ठिकाणी असणार आहे. या सुरक्षेच्या जोडीला शासकीय तंत्रनिकेतन इमारतीच्या भोवती सीसी टीव्हीची टेहळणी असणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांना बॅलेट मशिन्सच्या सुरक्षिततेची पाहणी करण्यास कळविले आहे. उमेदवारांनी स्वत वा प्रतिनिधीमार्फत चोवीस तास कधीही सुरक्षेचा पडताळा घेवू शकतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्वच सूचनांचे काटेकोर पालन येथे केले जात आहे. १८ एप्रिल रोजी सीलबंद झालेल्या बॅलेट मशिन्स आता १६ मे या मतमोजणी दिवशीच सीलमुक्त होणार आहेत. याच परिसरामध्ये मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.