‘निवडणूक लढवणे येऱ्यागबाळ्याचे काम नाही’ असे म्हणतात. त्यामुळे निवडणुकीत होणारा खर्च पेलण्याची ताकद ज्या उमेदवाराकडे आहे अशाच उमेदवारांना सर्वच राजकीय पक्षांनी पसंती दिली आहे.
    पनवेलचे भाजप उमेदवार प्रशांत ठाकूर हे जिल्ह्य़ातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याकडे ५७ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सांगितले आहे. त्याखालोखाल उरणचे विद्यमान आमदार आणि शेकापचे उमेदवार विवेकानंद पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ५२ कोटींची मालमत्ता दाखवली आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून तर तीन कोटय़धीश उमेदवार निवडणूक िरगणात आहेत. यात काँग्रेसचे मधुकर ठाकूर, शिवसेनेचे महेंद्र दळवी आणि शेकापच्या पंडित ऊर्फ सुभाष पाटील यांचा समावेश आहे.
     काँग्रेसच्या मधुकर ठाकूर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाकडे ४४ कोटींची मालमत्ता असल्याचे विवरण दिले आहे. तर शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी आपल्याकडे २९ कोटींची मालमत्ता असल्याचे दाखवले आहे. शेकापच्या पंडित पाटील यांच्याकडे १८ कोटींची मालमत्ता आहे.
     कर्जत विधानसभा मतदारसंघातून दोन करोडपती निवडणूक लढवत आहेत. यात विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश लाड आणि शिवसेनेच्या हनुमंत िपगळे यांचा समावेश आहे. सुरेश लाड यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात १७ कोटींच्या मालमत्तेचे विवरण दिले आहे. तर हनुमंत िपगळे यांनी आपल्याकडे १२ कोटींची मालमत्ता दाखवली आहे. श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे हेदेखील करोडपती आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे, अवधूत यांनी आपल्याकडे आठ कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
     महाड मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या माणिक जगताप यांच्याकडे १ कोटी ७ लाखांची जंगम, तर १ कोटी ७६ लाख रुपयांची जंगम मालमत्ता दाखवली आहे, तर त्यांच्या पत्नीकडे ३१ लाख रुपयांची जंगम आणि ३ कोटी ५१ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याच मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांच्याकडेही करोडोंची मालमत्ता आहे. गोगावले यांच्या नावावर ३९ लाख रुपयांची जंगम, तर ७४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ६० लाख रुपयांची जंगम, तर ८० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
   पेणचे शेकाप उमेदवार धर्यशील पाटील यांच्याकडे तीन कोटींची मालमत्ता आहे. तर याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री रवींद्र पाटील हेदेखील पावणेतीन कोटींच्या मालमत्तेचे धनी आहेत. पनवेलचे विधानसभा मतदारसंघातील शेकाप उमेदवार बाळाराम पाटील ९ कोटी, काँग्रेस उमेदवार आर. सी. घरत १४ कोटी, तर शिवसेना उमेदवार २ कोटी ९८ लाख रुपयांच्या मालमत्तेचे धनी आहे. एकूणच या वेळी निवडणुकीत खर्च करू शकेल अशा सक्षम नेत्यालाच उमेदवारी देण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी केला असल्याचे दिसून येत आहे.
प्रशांत ठाकूर –  ५७ कोटी
विवेक पाटील –  ५२ कोटी
मधुकर ठाकूर – ४४ कोटी
महेंद्र दळवी – २९ कोटी
पंडित पाटील- १८ कोटी
सुरेश लाड – १७ कोटी
अवधूत तटकरे – ८ कोटी