पायाभूत योजनेअंतर्गत (क्रमांक दोन) जिल्ह्य़ातील वीज विकासासाठी १ अब्ज ५८ कोटी ११ लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पैकी जालना, बदनापूर, भोकरदन तालुक्यांचा समावेश असलेल्या विभाग एकमध्ये ८७ कोटी ८१ लाखांची कामे, तर ७३ कोटी ३० लाखांची कामे अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तालुक्यांसाठी असलेल्या विभाग दोन अंतर्गत होणार आहेत.
या आराखडय़ाअंतर्गत जिल्ह्य़ात नवीन नऊ ३३/११ केव्ही उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. भाटेपुरी, वाकुळणी, केळीगव्हाण, सिपोरा बाजार, सिपोरा, चन्दनपुरी, बुटेगाव, बाणेगाव, बोररांजणी या ठिकाणी ही उपकेंद्रे होणार आहेत. जवळपास १ हजार ६०० नवीन रोहित्रांची उभारणी करण्यात येणार आहे. १ हजार ४६२ किलोमीटर लांबीची नवीन लघुदाब वाहिनी टाकण्याचा समावेश या आराखडय़ात आहे.
जालना शहरासाठी असलेल्या पायाभूत आराखडय़ाअंतर्गत (भाग ब) ५ नवीन उपकेंद्रांचे उद्दिष्ट होते. पैकी तीन उपकेंद्रांची उभारणी अजून बाकी आहे. ३३ केव्हीची नवीन उच्चदाब वाहिनी टाकण्याचे उद्दिष्ट आराखडय़ात असून, १०१ किलोमीटरपैकी प्रत्यक्षात ४३ किलोमीटर काम झाले आहे. ३५० पैकी १३७ रोहित्रांची उभारणी झाली. शेतकऱ्यांनी आवश्यक रक्कम व कागदपत्रे भरूनही २०१०-११ पासून जिल्ह्य़ात ६ हजार ५९२ कृषिपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. यात ५ वर्षांपूर्वी १ हजार ३९६ शेतकऱ्यांनी भरलेल्या कोटेशनचा समावेश आहे. जाफराबाद तालुक्यातून कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत सर्वाधिक १ हजार ५९७ शेतकरी आहेत. जालना ४६३, बदनापूर ५२७, भोकरदन १ हजार ३१०, अंबड ५८०, घनसावंगी ७८२, परतूर १ हजार २०४ व मंठा १२९ याप्रमाणे अन्य तालुक्यांतील कृषिपंप जोडण्या प्रलंबित आहेत.
जिल्ह्य़ात एकूण ३ लाख ८१ हजार ६१० वीजग्राहक आहेत. पैकी १ लाख ४ हजार ४२५ ग्राहकांचा पुरवठा थकबाकीमुळे कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. जिल्ह्य़ातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडील थकबाकी ८ अब्ज १६ कोटी असून तिच्या वसुलीचा प्रश्न वीज विभागासमोर आहे. कायमस्वरूपी पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडील थकबाकी ५७ कोटी आहे. याशिवाय पथदिव्यांसाठी स्थानिक स्वराज संस्थांना दिलेल्या वीजजोडण्यांची थकबाकी २२ कोटींपेक्षा अधिक आहे. घरगुती वीजग्राहकांकडे ३८ कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. उच्चदाब ग्राहकांकडील थकबाकी जवळपास ७४ कोटी आहे. पाणीपुरवठय़ाची थकबाकी सुमारे १० कोटी आहे. जिल्ह्य़ातील पाणीपुरवठय़ासाठी स्थानिक स्वराज संस्थांना दिलेल्या वीजजोडण्यांची संख्या ८८१ आहे.
जिल्ह्य़ात ३ हजार ८१५ औद्योगिक ग्राहक असून या विभागातील वीजबिलांची थकबाकी २२ कोटी आहे. जिल्ह्य़ात १० हजारांपेक्षा अधिक व्यावसायिक ग्राहक असून, यापैकी मोठी संख्या जालना शहरात आहे. व्यावसायिक ग्राहकांकडील थकबाकी ४ कोटीपेक्षा अधिक आहे. जिल्ह्य़ात १ लाख ३ हजार ९२४ कृषिपंप ग्राहक असून, त्यांच्याकडील थकबाकी ५ अब्ज ८९ कोटी रुपये आहे. चालू वर्षांत (२०१४-१५) जिल्ह्य़ात ८ हजार १०७ नवीन कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात आला. २०१२-१३ वर्षांत ४ हजार १९७, तर २०१३-१४ वर्षांत जिल्ह्य़ात ४ हजार ५१३ नवीन कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात आला.