नवनवीन कारखाने व वाढत्या लोकवस्तीमुळे सर्व जग भारनियमनाला सामोरे जात आहे. एकीकडे वाढत जाणारी वीज उपकरणे, तर दुसरीकडे कमी प्रमाणात होणारी वीजनिर्मिती यामुळे पुरवठा व मागणी या दोन्हींमध्ये मोठे अंतर आले आहे. कमी होत जाणारा इंधनसाठा यामुळे वीजनिर्मितीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. या पाश्र्वभूमीवर देवगिरी अभियांत्रिकीतील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या तिसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी स्पीड ब्रेकरमुळे वाया जाणारी शक्ती वीजनिर्मितीसाठी वापरली. या प्रोजेक्टला राष्ट्रीय स्तरावर पहिले बक्षीस मिळाले.
देवगिरीच्या विद्यार्थ्यांनी या स्पीड ब्रेकरमध्ये विशिष्ट उपकरण बसवले. यामध्ये दोन स्प्रिंगचा वापर करून त्याचे गतीऊर्जेमध्ये रूपांतर केले. ज्या वेळी एखादी गाडी स्पीड ब्रेकरवरून जाईल, त्याच वेळी उपकरणातील क्रँकशाफ्ट कार्यरत होईल. हा क्रँकशाफ्ट मधल्या बाजूने बेअरिंगला जोडला आहे. हा शाफ्ट गाडीच्या वजनाने १८० अंशामध्ये फिरतो व गाडी निघून जाईल, त्या वेळी परत हा शाफ्ट १८० अंशामध्ये फिरतो. त्यामुळे क्रँकशाफ्ट पूर्ण ३६० अंशामध्ये फिरतो. हे चक्र एक चेनच्या साहाय्याने डी. सी. जनित्राच्या रोटरला जोडले. याचे एक चक्र पूर्ण होताच वीज तयार होते. ही निर्माण झालेली वीज विद्यार्थ्यांनी १२ व्होल्टच्या बॅटरीत साठवली. या साठवलेल्या विजेचा वापर पथदिवे, सिग्नल आदींसाठी होऊ शकतो. या प्रोजेक्टचे वैशिष्टय़ म्हणजे यासाठी कोणत्याही इंधनाची गरज नाही.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सोळंके, स्थानिक प्रशासनाचे सदस्य शेख सलीम शेख अहमद, महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, विभागप्रमुख आर. एम. औटी, प्रा. संजय कल्याणकर आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.