जळगाव जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक रिमोटच्या मदतीने वीजमीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार वाढले आहेत. मीटरचा वेग ५० टक्के संथ करुन वीज चोरी करण्याऱ्या आठ जणांवर महावितरणाने कारवाई केली. यात महापालिकेच्या अभियंत्यासह बांधकाम व्यवसायीकाचाही समावेश आहे. या कारवाईतून एक लाख रुपयांपर्यंतची वीजचोरी उघडकीस आली. अजिंठा रोडवरील काशिनाथ हॉटेल मागील गृहकुल सोसायटीत वीजचोरी होत असल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता सुरेश पाचंगे यांना मिळाली. त्यानंतर २० जणांच्या पथकासह त्यांनी या भागात तपास मोहीम राबविली. १७० ग्राहकांचे वीज मीटर तपासण्यात आले.

यात गृहकुल हौसिंग सोसायटीतील दिपक सुभाष जैन, रामचंद्र महाराज, संजय मोहन जैन, आशा सपकाळे, सिद्धार्थ जैन, सीमा न्हावी, सुधा महाजन, यांसह मनपाचा स्थापत्य अभियंता चंद्रकांत सोमा सोनगिरे या ग्राहकांवर वीज चोरीची कारवाई करण्यात आली. तेथे वीज मीटर हे प्रमाणापेक्षा अधिक संथगतीने चालत असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी टू, थ्री फेज असणाऱ्या ग्राहकांनी घरातील एसीसाठीचा वीजपुरवठा थेट आकडा टाकून घेतल्याचे आढळून आले. या ग्राहकांना वीजपुरवठ्याच्या सरासरीनुसार मीटरची तपासणी करून दंड आकारला जाणार आहे. हा दंड भरला तरी देखील त्यांच्यावर वीजचोरीचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक अभियंता सुरेश पाचंगे यांनी दिली. पथकात सुधाकर विसावे, मंगेश पालवे यांच्यासह महिला अभियंत्यांचा समावेश होता.