राज्यातील पहिलेच उदाहरण; कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये पूर्ववत दिनक्रम

बिथरलेल्या ‘अजित’ नावाच्या हत्तीचे नक्षलग्रस्त कोलामार्का संरक्षित क्षेत्रातून स्थलांतरित करण्यात आले. त्याला इंजेक्शनने बेशुद्ध करून कमलापूर बेसकॅम्पमध्ये आणण्याची किमया ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केली. राज्यात अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून, सध्या या हत्तीची प्रकृती स्थिर आहे.राज्यात हत्तीच्या स्थलांतरणाचे हे पहिलेच उदाहरण आहे.

विशेष म्हणजे सध्या हत्तीची प्रकृती अतिशय चांगली असून कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये कुटुंबीयांसोबत पूर्वीसारखेच जीवन तो जगत आहे.

‘अजित’ नावाचा शासकीय नर हत्ती असून, त्याचे वय २२ वष्रे आहे. सिरोंचा वन विभागांतर्गत कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये आता त्याचे वास्तव्य आहे. तो सात हत्तीच्या कुटुंबांसोबत येथे राहतो. तो अतिशय आक्रमक असून बिथरल्यामुळे त्याने २०१३ मध्ये माहूत पेंटा आत्रामला ठार मारले होते. तसेच यापूर्वी २०१२ मध्ये त्याने वन विभागाची काही वाहने उलटवून मोठे नुकसान केले होते. त्यामुळे त्याला कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पायात बेडय़ा टाकून ठेवण्यात आले होते. मात्र, अशाही स्थितीत त्याला रात्रीच्या वेळी जंगलात सोडले जात होते. तो १२ जुलैच्या रात्री पायाची बेडी काढून टाकल्यानंतर नक्षलग्रस्त कोलामार्का संरक्षित वनात निघून गेला. त्याला रोजच्याप्रमाणे परत कमलापूर हत्तीकॅम्प येथे आणणे ही वन विभागासाठी एक कठीण बाब आणि आवाहन होते. कारण हे क्षेत्र भौगोलिकदृष्टय़ा अतिसंवेदनशील, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आहे. या भागात वनाधिकारी व कर्मचाऱ्यांवर नक्षलवाद्यांचे अनेकवेळा हल्ले झाले आहेत. हा हत्ती आक्रमक असल्याने त्याला तेथून कमलापूरला आणणे ही कठीण बाब होती. तो सात महिन्यांच्या हत्तीच्या पिल्लासोबत इतर सहा शासकीय हत्तीदेखील जंगलात घेऊन गेला. अशा कठीण परिस्थितीत बेशुद्ध करून त्याचा ताबा घेणे हा अंतिम पर्याय शिल्लक राहिला होता. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. या समितीचे प्रमुख म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्यासह मूलचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप छोनकर, डॉ. नीलेश खटाले व डॉ. सचिन केमलापुरे यांचा समावेश होता. परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम डॉ. रविकांत खोब्रागडे कमलापूर येथे गेले. तिथून त्यांनी कोलामार्क संरक्षित क्षेत्रात जावून हत्तीचा अभ्यास केला. पहिले एक ते दोन दिवस त्यांनी हत्तीला कमलापूरच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश आले नाही. सोबतचे सहा हत्ती कमलापूरच्या दिशेने निघाले तरी तो त्यांना कमलापूरला जाऊ देत नव्हता. तीन चार दिवस असेच गेल्यानंतर डॉ. खोब्रागडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सोबतच्या सहा हत्तींना हत्तीकॅम्पजवळ असलेल्या सिमेंट पाइप बसवलेल्या पुलाजवळ आणण्यात यश मिळविले. यावेळी डॉ. खोब्रागडे यांनी बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देणारा शूटर अमोल कोवासे यालाही सोबत घेतले होते. सर्व सहा हत्ती सिमेंट पाइपजवळ आल्यानंतर त्यात बसून ते अजितची वाट पाहत होते. दोन तासानंतर अजित सहा हत्तींजवळ आला. यावेळी कोवासे यांनी बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन अजितला दिले. तो खाली बसू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली. जवळपास पंधरा मिनिटानंतर अजित हा गुंगीत गेला आणि त्यानंतर अवघ्या अध्र्या तासात त्याला साखळदंडाने बांधून कमलापूर बेसकॅम्पमध्ये आणण्यात आले.