सेंट्रल बँक व महाराष्ट्र बँक; एकास अटक
महाराष्ट्र बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या २७ लाख ५० हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरुन नगर तालुका पोलिसांनी एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. सागर बाळासाहेब साळके (२१, पिंपळनेर पारनेर) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याला आज, शनिवारी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असली तरी पोलिसांना आज सायंकाळपर्यंत पळवलेली रोकड हस्तगत करता आलेली नाही.
परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक क्षीरसागर अधिक तपास करत आहेत. यासंदर्भात कंपनीचे विभागीय व्यवस्थापक किशोर भास्कर गिझरे (पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. तालुका पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बँक व सेंट्रल बँकेच्या एटीएममध्ये रोकड जमा करण्याचे काम या बँकांनी एसआयएस या खासगी कंपनीकडे सोपवले आहे. तीचे मुख्यालय चेन्नईत आहे. कंपनी बँकांच्या सूचनेनुसार ही कंपनी एटीएममध्ये रोकड जमा करते.
श्रीगोंद्यातील शिवाजी चौकातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देऊळगावसिद्धी (ता. नगर) येथील एटीएममध्ये जमा करण्यासाठी कंपनीने १९ मे पूर्वी रोकड सागर साळके याच्याकडे दिली होती. मात्र त्याने ही रक्कम एटीएममध्ये जमा न करता, त्याचा अपहार केल्याची तक्रार आहे. काल, शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयापुढे हजर केले असता, त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मात्र पोलिसांना अद्याप पळवण्यात आलेल्या रोकडचा तपास लागलेला नाही.
रोकड जमा करताना साळके याच्यासमवेत वाहनचालक, सुरक्षा रक्षक, अन्य कर्मचारी होते का, याची माहिती घेतली जात असल्याचे सहायक पोलीस अधीक्षक आनंद यांनी सांगितले. अशाच स्वरुपाचा गुन्हा सुमारे वर्षांपूर्वी नेवासे व राहुरी तालुक्यातील बँकांमध्ये घडला होता. त्यातील एक बँक महाराष्ट्र बँक होती. तेथेही बँकांच्या एटीएममध्ये, खासगी कंपनीमार्फत जमा करण्यासाठी दिलेली रक्कम, एटीएममध्ये जमा न करता पळवली गेली होती.
बँका एटीएममध्ये रोकड जमा करण्याचे काम कंत्राटी स्वरुपात सोपवतात. एटीएमसाठी वापरावयाचा कोड क्रमांकही या खासगी कंपन्यांना दिला जातो. त्याचा वापर करुन प्रत्यक्षात रकम जमा न करताच रोकड पळवण्याचे गुन्हे घडू लागले आहेत. एटीएममध्ये रोकड जमा केली गेली नाही, याची माहिती बँकांना काही दिवसानंतर समजते. एसआयएस कंपनीने अचानक तपासणी करत हिशेब तपासणी केली, त्यात वरील दोन्ही बँकांच्या एटीएममध्ये रोकड जमाच केली नसल्याचे निष्पन्न झाले.