देशाच्या आर्थिक, शिक्षण व्यवस्थेत बदल आवश्यक- प्रवीण तोगडिया

देशाच्या आर्थिक आणि शिक्षण व्यवस्थेत त्रुटी असून त्यात तातडीने बदल करणे आवश्यक आहे. ही व्यवस्था बदलण्यात आतापर्यंत सर्वच सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. या व्यवस्थेत तत्परतेने बदल न झाल्यास देशात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दिला. परिषदेतर्फे येथे रविवारी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत तोगडिया यांनी भाजपलाही घरचा अहेर दिला. हिंदुत्ववादी संघटनांकडून चाललेल्या घरवापसी अभियानाचे समर्थन करतानाच ‘लव्ह जिहाद’ला विरोध कायम राहणार असल्याचे विहिंपने म्हटले आहे. संमेलनात चार ठराव मंजूर करण्यात आले. त्यात अयोध्येतील संबंधित संपूर्ण जागेवर राम मंदिराची उभारणी करणे, सर्वासाठी समान राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी, सामाजिक समरसता, देशभरात गोवंश हत्या बंदी कायदा लागू करणे, यांचा समावेश आहे.

येथील जनार्दन स्वामी मठात आयोजित संत संमेलनास विहिंपचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव, राजेंद्र सिंह यांच्यासह साधू-महंत उपस्थित होते. संमेलनाच्या पूर्वसंध्येला विहिंपच्या केंद्रीय मंत्र्यांनी त्र्यंबकेश्वर येथे शैवपंथीय आखाडय़ांच्या महंतांशी चर्चा केली होती. परंतु, संमेलनाकडे उपरोक्त काही महंतांनी पाठ फिरविल्याचे पहावयास मिळाले. वैष्णवपंथीय आखाडय़ांशी संबंधित काही महंत उपस्थित असले तरी ग्यानदास महाराज मात्र अनुपस्थित होते. नुकत्याच जाहीर झालेल्या धर्मनिहाय जनगणनेतील आकडेवारीवर संमेलनात चर्चा झाली. मुस्लिमांच्या तुलनेत हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. ‘हम दो हमारे दो’ हा निकष सर्व जाती धर्मासाठी लागू करणे आवश्यक आहे. संपूर्ण देशात सर्व समाज घटकांसाठी राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करण्याचा विषय मांडण्यात आला. हिंदू धर्मातील ज्या दाम्पत्याला मूलबाळ होत नाही, त्यांना विहिंपसह हिंदुत्ववादी संघटना मोफत वैद्यकीय सेवा, औषधोपचार देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे तोगडिया यांनी सांगितले. त्यासाठी खास मदत वाहिनी सुरू करण्यात येणार आहे. हिंदू समाजाने स्पृश्य-अस्पृश्य, लहान-मोठा, श्रीमंत-गरीब असे भेदभाव मनातून काढून टाकावेत. हिंदुंची मंदिरे, संस्था सर्व समाजासाठी खुल्या केल्या पाहिजेत. हिंदू समाजातील सर्व घटकांना मंदिरांमध्ये दर्शन मिळायला हवे. सामाजिक समरसता प्रत्यक्षात आणण्यासाठी हिंदुधर्मीय सर्व एक आहेत यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

पत्रकार परिषदेत तोगडिया यांनी देशाच्या आर्थिक व शैक्षणिक धोरणांविषयी चिंता व्यक्त केली. चुकीच्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे अवघड झाल्याचे त्यांनी सांगितले. या धोरणांत बदल करण्यात आतापर्यंतची सरकारे अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. त्र्यंबकेश्वर येथे अतिक्रमण मोहीम राबविताना दोन मंदिरे काढण्यात आली. या मंदिरांची पुन्हा उभारणी न झाल्यास प्रशासनातील औरंगजेब कोण आहे, याची राज्य शासनाकडे तक्रार केली जाईल असेही ते म्हणाले.