बहुजन क्रांती मोर्चाचे मूल्यमापन

नगर येथे झालेल्या राज्यातील पहिल्याच बहुजन क्रांती मोर्चाने संयोजकांचा उत्साह दुणावला आहे. हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, असा प्रचार सुरुवातीला करण्यात आला. मात्र मराठा क्रांती मोर्चालाच हे उत्तर आहे, असे अंतिमत: जाहीर करून या मोर्चाने आता दलित व ओबीसी ऐक्याचा नारा दिला आहे. रामदास आठवले प्रकाश आंबेडकर या मातबर दलित नेत्यांनी मोर्चाच्या विरोधात जाहीर भूमिका घेऊनही मोर्चाला लाभलेला प्रतिसाद त्यांनाही वेगळा विचार करण्यास भाग पाडणारा आहे. या नव्या ऐक्याने ध्रुवीकरण होईल किंवा नाही, झाले तर कसे होईल, या मूल्यमापनाकडे आता अनेकांचे लक्ष आहे.

कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर राज्यात मराठा समाजाचे मोर्चे सुरू आहेत.

अ‍ॅट्रॉसिटीच्या मागणीमुळे दलित आणि आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी अशा दोन्ही समाजात मराठा मोर्चामुळे अस्वस्थता निर्माण झाली असून मराठा मोर्चाची संख्या जसजशी वाढत गेली, तसतशी ही अस्वस्थता अधिक व्यापक झाली. विशेष म्हणजे बहुजन क्रांती मोर्चात दलित, भटके, ओबीसी यातील विविध समाज सहभागी झाले आहेत. या एकीकरणाचा पहिला प्रयोग मोर्चाच्याच रूपाने नगरला झाला. बोलका मोर्चा असूनही झालेले शिस्तपालन कौतुकास्पद ठरले. त्याने संयोजक सुखावले आहेत. मोर्चाला झालेली गर्दी आणि शांततेत झालेली निदर्शने हे या मोर्चाचे मोठे यश मानले जाते. विविध ५२ संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मात्र यातील प्रत्येक समाजाची विचारधारा भिन्न आहे. त्यांची राजकीय नाळही, राजकीय व्यासपीठही भिन्न आहे. अशा स्थितीत अ‍ॅट्रॉसिटी आणि आरक्षण या किमान समान कार्यक्रमाच्या पातळीवर हे मागास समाज एकत्र आले, हे महत्त्वाचे मानले जाते.

बहुजन मोर्चाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले जाते. या माध्यमातून त्यांनीच दलित आणि मराठा समाजात फूट पाडल्याचा आरोप आता केला जात आहे. नगर येथील मोर्चातच हा संबंध थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही जोडण्यात आला. तसा जाहीर आरोपही भारतीय मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मोर्चाच्या जाहीर सभेतच केला. रा. स्व. संघाकडूनच दलितांचे प्रतिमोर्चे काढण्याचा प्रस्ताव आला होता, मात्र तो धुडकावून ओबीसींना बरोबर घेत बहुजन क्रांती मोर्चाचे स्वरूप देण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले. यथावकाश त्यावरही प्रकाश पडेल.

मात्र संयोजकांना हा आरोप मान्य नाही. मुळात ‘बहुजन क्रांती मोर्चा’ ही काही राजकीय मोर्चेबांधणी नाही. दलित आणि ओबीसी समाजात तयार झालेली असुरक्षितता लक्षात घेता मराठा मोर्चाला अशा मोर्चानेच उत्तर देणे भाग होते. शिवाय आम्हाला कोणी वज्र्य नाही, हा संदेशही त्यातून योग्य पद्धतीने गेला, असा संयोजकांचा दावा आहे.

नेत्यांबाबत दोन्हीकडे रोष!

मराठा समाजाने मोर्चामध्ये राजकीय नेत्यांना ठरवून पिछाडीवर टाकले. नगरसह अनेक ठिकाणी त्यांच्यावरील रोषही जाहीररीत्या प्रकट झाला. मराठा समाजाने राजकीय नेत्यांना या व्यासपीठावर मिरवू दिले नाही आणि बहुजन क्रांती मोर्चाला दलित नेत्यांनी विरोध करूनही हा मोर्चा काढण्यात आला. दोन्ही मोर्चामध्ये हे वेगळ्या अर्थाने साम्य आहे. मराठा समाजाने राजकीय नेतृत्वाला दूर सारले, तर बहुजन मोर्चा नेत्यांना धुडकावून काढण्यात आला.