राज्य आपत्ती सौम्यीकरण योजनेंतर्गत राज्यातील ३०० शहरांना इन्फ्लाटेबल लाइटिनग टॉवर उपलब्ध होणार आहेत. आपत्कालीन परिस्थीतीत वीजपुरवठा खंडित झाल्यास मदत व बचाव कार्यासाठी या लाइटिनग टॉवर्सची मदत होऊ शकणार आहे. यासाठी जवळपास सहा कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास मदत व बचाव कार्यात अनेक अडचणी येत असतात. रात्रीच्या वेळी उजेड नसल्याने अनेकदा बचावकार्य थांबवावे लागते. यामुळे बरेचदा आपदग्रस्त कुटुंबांना वेळेवर मदत मिळू शकत नाही. रायगड जिल्ह्यातील २५ जुल २००५ला झालेल्या जुई आणि दासगाव येथील भुस्खलनाच्या घटना असोत वा पुणे जिल्ह्यातील माळीण येथील दुर्घटना असो, रात्रीच्या वेळी मदत व बचावकार्य सुरू ठेवण्यात येणाऱ्या अडचणी अधोरेखित झाल्या. अशा परिस्थितीत २४ तास मदत व बचावकार्य सुरू ठेवता यावे यासाठी सहज स्थलांतरित करता येईल आणि बचावकार्यासाठी पुरेसा उजेड देऊ शकेल अशी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेच असल्याचे लक्षात आले. यातूनच इन्फ्लाटेबल लाइटिनग टॉवर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य आपत्ती सौम्यीकरण योजनेंतर्गत राज्यभरातील नगर पालिकांना या इन्फ्लाटेबल लाइटिनग टॉवरचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने ३०० लाइटनिंग टॉवर्सची खरेदी केली आहे. या आंतर्गत रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला १४ इन्फ्लाटेबल लाइटनिंग टॉवर प्राप्त झाले असून यातील ११ लाइटनिंग टॉवर नगर पालिकांना तर तीन लाइटनिंग टॉवर माणगाव, महाड आणि अलिबाग येथील प्रांताधिकारी कार्यालयांना वितरित केले जाणार आहेत.
इन्फ्लाटेबल लाइटनिंग टॉवर्स हे एक पोर्टेबल युनिट असून ते आपत्कालीन परिस्थितीत सहजपणे कुठेही नेता येऊ शकरणार आहे. यात पेट्रोलवर चालणाऱ्या जनरेटरचा समावेश असून जनरेटर सुरू केल्यावर यातून विशिष्ट पद्धतीच्या कापडाने बनलेला साडेचार मीटरचा लाइटनिंग टॉवर तयार होणार आहे. हा टॉवर लगतच्या १० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात उजेड देऊ शकणार आहे. यापूर्वी हे लाइटनिंग टॉवर रेल्वे विभाग आणि संरक्षण विभागाकडून अशा पद्धतीच्या लाइटनिंग टॉवर्सचा वापर केला जात होता. आता आपत्कालीन परिस्थितीत या लाइटनिंग टॉवर्सची मदत होऊ शकणार आहे.
कोकणातील दुर्गम भागात आपत्कालीन परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यात अनेक अडचणी येत होत्या
 या लाइटनिंग टॉवर्सच्या मदतीने या दुर्गम भागातही आता रात्रीच्या वेळी मदत पुरवणे शक्य होऊ शकेल असा विश्वास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.