देयके मंजूर करण्यासाठी ५ लाखांची लाच मागितली
केलेल्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या खारभूमी विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. अशोक भारती असे या लाचखोर कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे.पेण येथील एका ठेकेदाराने खारभूमी विभागामार्फत तीन कामे केली होती. त्यापकी एका कामाची पाच लाख २८ हजार रुपयांची रक्कम ठेकेदाऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आली होती.

मात्र उरलेल्या दोन कामांची देयके मंजूर होत नव्हती. ही देयके मंजूर करण्यासाठी ठेकेदार खारभूमी कार्यालयात सातत्याने जात होता. त्याने प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक भारती यांच्याकडे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.
मात्र केलेल्या कामाची देयके मंजूर करण्यासाठी भारती यांनी लाचेची मागणी केली. देयकाची ९० टक्के रक्कम मला दे आणि १० टक्के रक्कम तुझ्याकडे ठेव, असे भारती यांनी या ठेकदाराला सांगितले होते. देयकाची रक्कम साडेपाच लाख रुपये होती. त्यापकी पाच लाख रुपये भारती यांनी मागितली होती.

ठेकेदार यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे दिली होती. या तक्रारीची गुरुवारी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीनंतर ४ लाख ५० हजार रुपये स्वीकारण्याचे भारती यांनी मान्य केले. या रकमेतील एक लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना पेण येथील अभ्युदय बँकेच्या समोर लाचलुचपत प्रतिबंधक विभगाच्या पथकाने अशोक भारती यांना जेरबंद केले.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे खारभूमी विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी भारती आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे सचिव यांनी नुकतेच दिले होते. त्यांची चौकशी सुरू असतानाच भारती यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक झाल्याने खारभूमी विभागातील गरव्यवहार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक अर्डेकर तपास करत आहेत. दरम्यान भारती यांच्या मालमत्तेची चौकशीही केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.