देशातील तरूणांच्या भवितव्यासाठी शिक्षण पद्धतीत मोठा बदल अपेक्षित आहे असे भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. सरकार देशाला धार्मिकतेचे आधार देण्याचे काम करत आहे. त्यामुळे एक नेता, एका जातीची सत्ता यापुढील काळात राहणार नसल्याचा दावादेखील त्यांनी कणकवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
भारतात भावनीकतेचे राजकारण करायचे? हे ठरविले पाहिजे. देशाला धार्मिकतेचा आधार द्या म्हणणाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. नागरी समुह स्वतंत्र देशावर विश्वास ठेवत आहे. देशाला प्रमुख मानायचे ही भूमिका स्वतंत्रकाळात लढणाऱ्या पीढीने घेतलेली होती. देशाला कुठल्याही धर्माचा आधार नाही. पण जो देव मानतो त्याला त्या धर्माचा, देवाचा प्रसार करण्यचा अधिकार देण्यात आला आहे असे आंबेडकर म्हणाले.
सध्या देशात कुठलेही राजकीय पक्षाचे नेतृत्त्व विश्वासार्ह राहिलेले नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पक्षधोरण बदलून जनतेच्या हिताचे धोरण राबविले तेच शेवटचे नेतृत्त्व ठरले आहे. त्यानंतर पक्षाचा अजेंडा राबविणारे अनेक नेते दिसून येत आहेत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत:च एक मॉडेल होते. विकासाची संकल्पना राबविताना त्यांना बाहेरून एकतर हेरगिरी किंवा निव्वळ नफा मिळविण्याच्या दृष्टीने येईल. आरक्षण हा मुद्दा संपविण्यासाठी देशाचा विकास झाला पाहिजे. तरूणांच्या हाताला काम मिळण्यासाठी शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडविण्याची गरज आहे. शिक्षणाचा आवाका, त्या पलीकडे व्यावसायिक शिक्षणाकडे गेल्यास निश्चितच त्याचा फायदा तरूणांना होईल. टॅलेंट हन्ट असलेल्या ७० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या तरूणांना चॉईस शिक्षण दिले पाहिजे तरच देशाची उन्नती होईल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग व मुंबई शाखेच्या वतीने कुडाळ येथील बौद्ध धम्म मेळाव्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी माणसासाठी धर्म की धर्म माणसासाठी हा वाद निर्माण होणार आहे असे म्हटले. या मेळाव्यात प्रा. अंजली आंबेडकर, सत्यवान जाधव, प्रभाकर जाधव, एम. एन. आगासे, शिवाजी वर्देकर, सदानंद कासले, विलास जाधव आदी उपस्थित होते.
देशात नोकर व मालक यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. हे सर्व चित्र थांबविण्यासाठी जनजागृती अभियानाची गरज आंबेडकर यांनी व्यक्त केली.
देशात धर्माच्या नावाखाली येणाऱ्या नव्या वादळाला आपणास तोंड द्यावे लागणार आहे. संशोधन केंद्र, महाविद्यालये, विद्यापीठ या ठिकाणी हे वादळ पोहचत आहे. लोकशाही असणाऱ्या आपल्या देशात प्रत्येक माणसाचे प्रभुत्व राहणे गरजेचे आहे असे आंबेडकर म्हणाले.
गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मानवता धर्माचेच पालन करा. सत्ता ही पाण्यातील बुडबुडय़ासारखी असून ती बुडबुडय़ासारखीच विरघळून जाईल. पण तुमचा विचार परिवर्तन घडविणारा ठरेल. त्यासाठी स्वत:ची मते ठामपणे मांडा, जातीयता मानू नका, दुटप्पी भूमिका ठेवू नका असे आवाहनदेखील प्रकाश आंबेडकर यांनी केले.
यावेळी धम्म बांधवाचा सत्कारदेखील करण्यात आला. कुडाळ येथे झालेल्या या सभेस मोठय़ा प्रमाणात बांधव उपस्थित होते.