हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आलेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकरिता शासकीय तिजोरीतून मोठय़ा प्रमाणात खर्च करून निवास व्यवस्था केलेली असताना या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी मात्र शहरातील महागडय़ा हॉटेल्समध्ये राहण्याचा पर्याय निवडला आहे. शहरातील जवळपास सर्व मोठय़ा हॉटेल्समधील खोल्या लोकप्रतिनिधी व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकरिता विशेषत्वाने आरक्षित करण्यात आल्या आहेत.
दरवर्षी नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकरिता येणाऱ्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकरिता आमदार निवास, रविभवन, नागभवन, हैदराबाद हाऊस या ठिकाणी निवासाची व्यवस्था केली जाते. या सगळया ठिकाणांची डागडूजी आणि रंगरंगोटी याकरिता मोठय़ा प्रमाणावर निधी व मनुष्यबळाचा वापर केला जातो. एवढा सगळा खर्च करूनही ज्यांच्यासाठी हे सगळे केले जाते ते लोकप्रतिनिधी व अधिकारी मात्र, प्रत्यक्षात या निवासस्थानी अपवादानेच राहतात. शहरातील रॅडिसन ब्लू, सेंटर पॉईंट, तुली इंपेरियल या व यासारख्या इतर हॉटेल्सध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खोल्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. अधिवेशनाच्या संपूर्ण काळाकरिता हे व्हीव्हीआयपी महागडय़ा हॉटेल्समध्येच वास्तव्य करणार आहे.  आमदार निवासात न राहण्यासंदर्भात यातील काहींना पृच्छा केली असता, त्यांच्याकडून येणा-या प्रतिक्रियाही अत्यंत मासलेवाईक आहेत. यामध्ये या शासकीय निवासांमधील ढेकणांपासून ते भेटणाऱ्यांची गर्दी टाळण्यापर्यंत अनेक किस्स्यांचा समावेश आहे.
शहरातील काही हॉटेल्समध्ये त्यांच्याकडील अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांची चौकशी केली असता, कुणीही नावे उघड करावयास तयार नाहीत. मात्र अनेक आमदार व उच्चपदस्थ अधिकारी  राहायला असल्याचे हॉटेल्स व्यवस्थापन दबक्या आवाजात मान्य करतात. यामध्ये वजनदार नेते व आमदार आहेत तसेच अगदी सचिव स्तरावरचे अधिकारीदेखील आहेत. हॉटेल्सव्यतिरिक्त शहरातील उच्चभ्रू परिसरातील सदनिकांमध्येही अनेक नेत्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  दुष्काळ आहे म्हणून लोकप्रतिनिधींना तारांकित सुविधा उपभोगणे थांबवले आहे असेही नाही. सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दुष्काळाबाबत भरभरून काळजी व्यक्त करणारे लोकप्रतिनिधींला विधिमंडळ परिसराच्या बाहेर दुष्काळाची आठवणही येत नसल्याचे चित्र आहे.

वेगवेगळया पक्षांच्या आमदार व नेत्यांचे विविध हॉटेल्समध्ये वास्तव्य आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेना लोकप्रतिनिधी हॉटेल प्राईडला राहात असून काँग्रेसचे मान्यवर सदर भागातील तुली इंटरनॅशनल व रामदासपेठेतील सेंटर पॉईंटमध्ये वास्तव्यास आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांचा निवास तुली इंपेरियलमध्ये आहे. याशिवाय, एअरपोर्ट सेंटर पॉईंटमध्येही लोकप्रतिनिधींचे वास्तव्य आहे. अनेक उच्चपदस्थ व सचिव स्तरावरील अधिका-यांनी वर्धा मार्गावरील रॅडिसन ब्लू हॉटेलचा पर्याय पसंत केला आहे.