सोलापूर शहराजवळील कुंभारी येथे कॉ. गोदूताई परुळेकर विडी घरकुल परिसरात राहणा-या एका तरुणाचे अपहरण केल्याचा गुन्हा खोटा व बनावट असल्याचे पोलीस तपासात आढळून आले असून याप्रकरणी संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर हा बनावट अपहरणाचा कट उधळला गेला.
गोदूताई परुळेकर विडी घरकुल परिसर अलीकडे जातीयदृष्टय़ा संवेदनशील म्हणून ओळखला जात असतानाच गेल्या २२ मार्च रोजी याच भागात राहणा-या अजित अप्पाराव दारफळे (२२) व मुश्ताक अमीनसाहेब शेख (१९) यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मोठय़ा हाणामारीत झाले होते. त्या वेळी मुश्ताक शेख याचे अजित दारफळे व इतरांनी अपहरण केल्याची फिर्याद वळसंग पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. तर इतर घटनेत खुनाचा प्रयत्न व दरोडय़ाचेही गुन्हे पोलिसात दाखल झाले होते. यातून जातीय तणाव वाढल्याने पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास हाती घेतला असता तीन दिवस उलटले तरी अपहृत मुश्ताक शेख याचा शोध लागत नव्हता. त्यातून अफवांनाही ऊत आला होता. या पार्श्र्वभूमीवर सोलापूर ग्रामीण विभागाचे १५ पोलीस अधिकारी व ३०० पोलीस कर्मचा-यांचा बंदोबस्त विडी घरकुल भागात तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी रस्ता संचलनही केले होते.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने अपहृत मुश्ताक शेख याचा शोध घेण्याची जबाबदारी घेतली. सोलापूर शहरासह गुलबर्गा, अक्कलकोट, होटगी आदी भागात शोधकार्य हाती घेण्यात आले. यात काल गुरुवारी रात्री शहरातील निराळे वस्ती येथे मुश्ताक याचा सावत्र भाऊ हैदर अमीनसाहेब शेख याच्या घरी तपास केला असता त्याच वेळी हैदर यास विडी घरकुल येथे राहणा-या राजू नदाफ नावाच्या त्याच्या मावस भावाने मोबाइलद्वारे संपर्क साधून, ‘मुश्ताक को दुसरी तरफ छुपाओ, पोलीस उसको तलाश कर रही है’ असा निरोप दिला. मोबाइल स्पिकरवर हे संभाषण पोलिसांनी ऐकले. तेव्हा मुश्ताक हा हैदरच्याच ताब्यात असल्याचा संशय बळावला. पोलिसांनी हैदर यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता अखेर हे अपहरणनाटय़ खोटे व बनावट असल्याचे दिसून आले. मुश्ताक यास त्याचा मेहुणा अलीम याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन कौसडीकर व पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांच्यासह हवालदार सुनील चव्हाण, अनिल गायकवाड, फैयाज बागवान, महिबूब शेख, समीर शेख, प्रेमेंद्र खंडागळे, मोहन मन्सावाले व चालक केशव पवार यांनी हा बनावट अपहरण प्रकरण उघडकीस आणले.