महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱयाला जबरदस्तीने चपाती खायला घालून त्याचा रोजाचा उपवास मोडल्याच्या वृत्ताचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खंडन केले. आपल्या खासदारांकडून अशी वर्तणूक झालेली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबादमध्ये वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले. शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठीच आपल्या खासदारांवर असे आरोप करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आम्ही हिंदूत्त्ववादी असलो, तरी इतर धर्माचा द्वेष करीत नाही. आपल्या पक्षाच्या खासदाराकडून अशी वर्तणूक झालेली नाही. केवळ शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठीच आपल्या पक्षाच्या खासदारावर असे आरोप करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रीय जेवण दिले नाही म्हणून शिवसेनेच्या ११ खासदारांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील केटरिंगची व्यवस्था पाहणाऱया निरीक्षकाचा रोजाचा उपवास मोडल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हा प्रकार घडला.