एकीकडे दुष्काळ, तर दुसरीकडे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या सत्काराचा सुकाळ असे वातावरण शनिवार व रविवारी औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांत होते.
औरंगाबाद शहरातील क्रांती चौकापासून लोणीकर यांची हार-तुरे स्वीकारत जंगी मिरवणूक काढण्यात आली. मोटारसायकलस्वारांची लक्षणीय संख्या असलेली मिरवणूक तापडिया नाटय़गृहापर्यंत पोहोचल्यावर तेथे लोणीकर यांचा शाल, श्रीफळ व तलवार भेट देऊन मोठा सत्कार करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष बापू घडामोडे यांच्यासह भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांची या वेळी मोठी उपस्थित होती.
औरंगाबाद महापालिकेची आगामी निवडणूक भाजप एकटय़ाच्या बळावरजिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास दानवे यांनी या वेळी व्यक्त करून ‘एक झेंडा एक अजेंडा’ असे पक्षाचे घोषवाक्य असल्याचे सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप करून दुष्काळाच्या संकटावर महायुती सरकार मात करील, असे लोणीकर म्हणाले.
शनिवारी सायंकाळी जालना येथे लोणीकरांचा नागरी सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या वेळी राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटय़ाल, शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, रिपाइंचे मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांची भाषणे झाली. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते. शहरातही काही ठिकाणी लोणीकर यांचा सत्कार व शर्करातुला करण्यात आली. औरंगाबादहून जालना शहराकडे जाताना वाटेतही पक्ष कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी सत्कार केले, तसेच होर्डिग्ज उभारून अभिनंदन केले.
टंचाई आढावा बैठक साडेचार तास उशिराने!
जालना शहरातील सत्कार कार्यक्रमास प्राधान्य देण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ५ वाजता आयोजित पाणीटंचाई आढावा बैठक चार-साडेचार तास उशिरा सुरू झाली. तोपर्यंत अधिकारीवर्ग ताटकळत बसला! रविवारी सकाळी जालना ते परतूर दरम्यान अनेक ठिकाणी लोणीकर यांचे सत्कार झाले. परतूर शहरात मिरवणूक काढून भव्य सत्कार झाला. दुपारनंतर आष्टी येथे मिरवणूक व लोणी येथील स्वच्छता अभियानात उपस्थिती असा मंत्रिमहोदयांचा कार्यक्रम होता. रात्री जालना शहरात जिल्हा व्यापारी संघटनेने मेजवानीचे आयोजन केले होते. औरंगाबाद शहरातील सत्कार पक्षाचा, तर जालना येथील नागरी सत्कार सर्वपक्षीय होता. काँग्रेस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालना येथील सत्कारास हजर होते. जालना येथील निमंत्रणपत्रिकेवर विशेष अतिथी म्हणून २६ नावे होती, तर सत्कार समितीत २३ पदाधिकारी व १२५ पेक्षा अधिक ‘संयोजक आणि मार्गदर्शक’ होते.