हातउसने किंवा भाडय़ाने वस्तू घेऊन गरज भागविणे ग्रामीण भागास नवे नाही. मात्र, शेती औजारांबाबत असे करून चालत नाही. ती विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो, पण प्रत्येक कष्टकऱ्यास हे शक्य होत नाही. ही गरज ओळखून वर्धा जिल्ह्य़ातील २० महिलांनी अशी अवजारेच भाडय़ाने देऊन गरजूंची निकड भागविण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला. आज हजारो एकर शेतावर अशा भाडेतत्त्वावरील अवजारांनी गरजूंची शेती पिकत आहे. स्वत: मालक व स्वत:च कष्टकरी अशा या महिला शेतकऱ्यांच्या कष्टाला यशाच्या पारंब्या फुटल्या.
वर्धा तालुक्यातील लोणसावळी येथे अशा सोयीचे सामूहिक सुविधा केंद्र सुरू झाले. शेतीशी निगडित कुदळ, पावडे, टोपले, वखर, नांगर, फ वारणी व पेरणी यंत्र, स्प्रिंकलर, ताडपत्री, अशा स्वरूपातील २० प्रकारची अवजारे उपलब्ध आहेत. वीस हजारांचे यंत्र विकत घेण्याची प्रत्येकाचीच ऐपत नसते. उधारीवर मागायचे तोवर पेरणीचा काळ निघून गेलेला असतो, मात्र या सुविधा केंद्रात दिवसाप्रमाणे प्रत्येक अवजार उपलब्ध आहे. २० महिलांचा एक गट हे केंद्र चालवितो. त्याचे ५०वर सदस्य आहेत. दरदिवशी ३० रुपये याप्रमाणे तिफण, तर ३ रुपये दराने कुदळ भाडय़ाने दिली जाते. सदस्य नसलेल्यासही दीडपट भाडय़ाने अवजारे पुरविली जातात. परवडेल अशा पद्धतीने या महिलांनीच हे दर ठरविले. वस्तूची तोडफोड झाल्यास त्याची भरपाई टप्प्याटप्प्याने वसूल होते. याची प्रेरणा महिलांना अपघातानेच मिळाली. वायफ ड येथे डॉ. स्वामिनाथन फाऊंडेशनचे केंद्र आहे. त्यास भेट देण्यास विख्यात कृषिशास्त्रज्ञ डॉ. स्वामिनाथन आले असताना कष्टकरी शेतकरी महिलांनी ही बाब उपस्थित केली. त्यावर हा उपाय सुचविण्यात आला. फाऊंडेशनने १ लाख रुपयांचे बीजभांडवल दिले. त्यातून अवजारे खरीदण्यात आली.
लोणसावळीपाठोपाठ सोनेगावालाही असेच सुविधा केंद्र सुरू झाले आहे. त्याचेच लोण आता यवतमाळ जिल्ह्य़ातील विहीरगावला पोचले. स्वामिनाथन फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक किशोर जगताप म्हणाले की, आमची भूमिका आता नाममात्रच आहे. साहित्याचा हिशेब, भाडेवसुली, जमाखर्च वगैरे सर्व काही महिलाच सांभाळतात. गैरव्यवहाराची तक्रार नाही. केंद्रचालक योगिता होले म्हणाल्या, पेरणीपूर्व ते माल बाजारात नेण्यापर्यंत आवश्यक सर्व सामग्री केंद्राकडे आहे. भाडय़ाच्या पैशातूनच साहित्य वाढविले. दोनच वर्षांत भाडय़ापोटी ८० हजार रुपये जमा झाले. त्यातूनच दोन बैलगाडय़ा विकत घेतल्या. तीनही केंद्रातून आता पावणेतीन लाख रुपये बँकेत जमा आहेत. पै पैचा हिशेब, भाडय़ाने दिल्याची पावती, औजार दुरुस्ती खर्च, अशाही किरकोळ बाबींची नोंद असते.