व्यापाऱ्यांनी अनुसरलेल्या गोणी कांदा लिलाव पद्धतीला विरोधात गुरुवारी जिल्हय़ात आंदोलनाचे सत्र सुरू राहिले. कळवण येथे शेतकरी व सर्वपक्षीयांनी संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळला तर देवळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावर रास्तारोको करण्यात आला. शासनाने कृषिमाल नियमनमुक्त करताना आडतीतून शेतकऱ्यांची सुटका केली. खरेदी करणाऱ्याला आडत द्यावी लागणार असल्याने व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकत संप पुकारला. अखेरीस हा संप मागे घेताना व्यापाऱ्यांनी राज्यात इतर ठिकाणी गोणी कांद्याचा जसा लिलाव होतो, तसाच स्थानिक पातळीवरील १५ बाजार समित्यांमध्ये करण्याची अट घातली. त्यास बाजार समित्यांनी सहमती दर्शविल्याने लिलाव सुरू झाले. परंतु, त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. या अटीद्वारे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना कोंडीत पकडल्याची सार्वत्रिक भावना आहे. सध्या कांद्याचा सरासरी भाव प्रति क्विंटलला ८२५ रुपयांच्या आसपास आहे. त्यावर साधारणत: ३२ रुपये आडत द्यावी लागते असे. या खर्चातून सुटका झाली असली तरी तो गोणीबंद स्वरूपात करण्याचा खर्च प्रति क्विंटलला ७० ते ८० रुपये आहे. सध्याचे भाव विचारात घेता हा बोजा कोणालाही परवडणारा नसल्याने शेतकरी त्यास विरोध करत आहे. यामुळे बाजार समितीत कांद्याची आवकही जेमतेम स्वरूपात आहे. लासलगाव बाजारात गुरुवारी सुमारे साडेचार हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. इतर बाजार समित्यांमध्ये हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. बाजार समित्यांनी पूर्वीप्रमाणे मोकळ्या वाहनातील कांद्याची खरेदी करावी, या मागणीसाठी रास्तारोको करत वाहतूक रोखून धरण्यात आली. व्यापाऱ्यांच्या आठमुठय़ा धोरणाचा निषेध करण्यात आला. दुसरीकडे कळवण तालुक्यात सर्वपक्षीयांनी तालुका बंदची हाक दिली होती. वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यावसायिकांनी त्यास पाठिंबा दिला. व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे सध्या चाळीत साठविलेला कांदा खराब होऊ लागला आहे. व्यापारी गोणी कांदा लिलावावार ठाम राहिल्याने कळवण बाजार समितीत सलग १८ व्या दिवशीही लिलाव बंद राहिले.