मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर तीन दिवसांचा मुक्काम करून आलेल्या महाराष्ट्रातील २५ शेतकऱ्यांच्या अस्थींचे बुधवारी सांगली जिल्ह्यातील नरसोबच्या वाडीत कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर विसर्जन झाले. ३१ वर्षांपूर्वी पत्नी आणि मुलांसह मरणाला जवळ करणाऱ्या साहेबराव करपे यांच्यापासून वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केलेल्या लातूरच्या शीतल वयाळ यांच्यापर्यंत अशा २५ शेतकऱ्यांच्या अस्थी कृष्णा-पंचगंगेत विलीन झाल्या.

राजकीय पुढाऱ्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या मृत्यू पश्चात राज्यभरात त्यांचा अस्थिकलश फिरवला जातो. मात्र सगळ्यांचा पोशिंदा असलेल्या शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातोय. त्याची कोणालाही चिंता नाही. ‘बळी’ गेलेल्या शेतकऱ्याकडे लक्ष वेधण्यासाठी सांगलीमधील शेतकरी विजय जाधव यांनी अस्थिकलश यात्रा काढली. ६ मे रोजी कोडोली येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांची अस्थी घेऊन जाधव यांनी या यात्रेला सुरुवात केली. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, आंबेगाव, नागपूर, नाशिक असा दोन हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास जाधव यांनी दुचाकीवरून केला. अस्थिकलश घेऊन विजय जाधव हे मुंबईतदेखील आले होते. राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांच्या वेदना जाधव यांना मांडायच्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ देण्यात आला नाही.

संघर्ष यात्रा, शिवसंपर्क अभियान, आत्मक्लेश यात्रा या यात्रांच्या गोंधळात आणि संवाद यात्रेच्या नियोजनात व्यस्त असलेल्या मुख्यमंत्र्यांना शेतकरी वेदना जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. आम्हाला कर्जमाफीही देऊ नका. फक्त आम्ही पिकवलेल्या शेतमालाला भाव द्या. शेतकरी सरकारला कर्ज देतील अशी भावनिक प्रतिक्रिया जाधव यांनी दिली. शिवाय यापुढेही शेतकरी प्रश्नाचा लढा चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.