दुष्काळामुळे कर्ज फेडता न आल्याने जीवन संपविले; परिसरात हळहळ

सततची नापिकी व डोक्यावर वाढलेल्या कर्जामुळे जीवन जगणे अशक्य झालेल्या तालुक्यातील नांदगाव शिवारातील दोन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी मृत्यूला कवटाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनांची पोलीस तसेच महसूल यंत्रणेने दखल घेतली असून झाल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

सौंदाणे येथील रहिवासी असलेले महादू कारभारी पवार (५७) यांनी गुरुवारी पहाटे राहत्या घरी विषारी पदार्थ सेवन केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सौंदाणे हद्दीला लागून असलेल्या नांदगाव शिवारात पवार यांची शेती असून तेथील स्थानिक विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे त्यांच्यावर साठ हजाराचे कर्ज होते. गेली तीन वर्षे दुष्काळामुळे अपेक्षित उत्पादन येऊ शकले नसल्याने ते कर्ज फेडता आले नाही.

दुसऱ्या घटनेत नांदगाव शिवारातीलच जगन विठ्ठल अहिरे (३८) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. जगन हे नांदगावपासून जवळच असलेल्या डोंगरगाव (ता.देवळा) येथे वास्तव्यास होते. गुरुवारी पहाटे राहत्या घरात गळफास घेतल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईकांनी त्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

त्यांच्यावर स्थानिक संस्थेचे ७० हजाराचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही घटनांचे पंचनामे करण्यासाठी महसूल यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

कांदा विक्रीतून खर्चही वसूल नाही

हातात पैसा नसल्याने शेती भांडवलाचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी उधार-उसनवारी करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळींकडून अडीच लाखांची रक्कम घेतली होती. यंदा कांद्याचे चांगले उत्पादन झाल्याने डोक्यावरील कर्जाचा हा बोजा हलका होईल, अशी आशा होती. परंतु मातीमोल भावाने कांदा विक्री करण्याची वेळ आल्याने उत्पादन खर्चही वसूल झाला नाही.  या विवंचनेतून गेल्या काही दिवसांपासून त्यांना एकप्रकारे वैफल्य आले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.