अडचणींबाबत आज पुण्यात बैठक

कर्जमाफीसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असताना आता सेवा संस्था व बँकांनाही प्रत्येक कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत. दुहेरी अर्जाची छाननी झाल्यानंतरच पात्र लाभार्थी निवडले जातील. दरम्यान, कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी पुणे येथे आज शनिवार, दि. १९ रोजी राज्यातील जिल्हा बँकांचे कार्यकारी संचालक व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची बठक आयोजित करण्यात आली आहे.

कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर आता अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीला पात्र लाभाथीर्ंची यादी तयार करण्यात आली. तिची तपासणी ही सहकार खात्याच्या हिशोब तपासनीसांमार्फत करण्यात आली. जिल्हा बँकांकडे त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सोपविण्यात आले नाही. आता कर्जमाफीकरिता पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक समस्या निर्माण झाल्या असून जिल्ह्यतील सुमारे ३११ सेवा संस्थांची संगणकप्रणालीत नावेच आलेली नाहीत. या संबंधी तहसीलदारांकडे तक्रारी करून जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रित माहिती तंत्रज्ञान विभागाला द्यावयाची आहे. त्यानंतर संगणक प्रणालीमध्ये ही नावे समाविष्ट केली जातील. आजतरी हजारो शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना अनेक अडचणी येतात. शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पती-पत्नी व मुलांचे आधारकार्ड, बँक खाते त्याच्याशी संलग्न असावे लागतात. अनेकांचे ते संलग्न नसल्याने पेच निर्माण होतो. आधारला मोबाइल नंबर जोडलेला नसेल तर लाभार्थीच्या हाताचे ठसे लागतात. तसेच बँकखात्याचा क्रमांक द्यावा लागतो. हा अर्ज भरताना चूक झाली तर त्याची दुरुस्ती करण्याची संगणक प्रणालीत सुविधा नाही. माहिती तंत्रज्ञान विभागाकडे ऑनलाइन तक्रार केल्यानंतर ५ ते १० दिवसांनी तो अर्ज निकाली निघाल्यानंतर नवीन अर्ज भरता येतो. अर्जातील दुरुस्ती संदर्भात हेल्पलाइन तयार करण्यात आली आहे. मात्र दूरध्वनी केल्यानंतर तेथे कोणीही प्रतिसाद देत नाही. हेल्पलाइन ही नावापुरतीच उरली आहे.

मयत सभासदांचे अर्ज कसे भरायचे असा पेच निर्माण झाला आहे. अनेकांच्या वारसाच्या नोंदीच झालेल्या नाही. त्याकरिता न्यायालयातून वारस प्रमाणापत्र मिळवावे लागणार आहे. ऑनलाइन अर्जामध्ये त्याकरिता विभाग नाही. शेतकऱ्यांकडे अनेक बँकांचे कर्ज असेल तर एकाच अर्जात त्याचा समावेश करण्याची सुविधा नाही. अशा एक ना अनेक कटकटींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आता सेवा संस्थांनाही प्रत्येक खातेदाराचे ऑनलाइन अर्ज भरून घेऊन त्याची ऑफलाइन पद्धतीने बँक अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावयाची आहे. तसा आदेश आज सहकार खात्याला मिळाला. सोमवारपासून सेवा संस्थांना त्याचे आदेश दिले जाणार असून पुन्हा त्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.

सेवा संस्थांना सुमारे १५६ प्रकारची माहिती ऑनलाइन अर्जामध्ये भरावी लागणार आहे. त्यामध्ये जन्मतारीख, पॅनकार्ड, आधारकार्ड, कर्ज घेतल्याची तारीख, परतफेडीची तारीख, कुटुंबातील सदस्यांची माहिती अशा प्रकारे पंचवीस विभाग हे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या वैयक्तिक माहितीसंबंधी आहे. त्यानंतर कर्ज खतावणीवरून अन्य माहिती भरावयाची आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी स्वतंत्र रीत्या ऑनलाइन अर्ज भरले त्यांचा नोंदणीक्रमांक आल्यानंतरच त्यांचीच माहिती भरली जाणार आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी कालावधी अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर सेवा संस्थांचे ऑनलाइन अर्ज भरले जातील. त्याची पुन्हा हिशोब तपासनीसांकडून तपासणी केल्यानंतर मग सरकारला नावे कळविली जाणार आहे.

बँकेची शेतकऱ्यांना मदत

कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी जिल्हा बँकेकडे नाही. पण तरी देखील बँकेने शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मदत केली आहे. अनेक संस्थांनी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा गावातच संस्थेत उपलब्ध करून दिली आहे. ज्या अडचणी येत आहे, त्या संदर्भात सहकार खात्याशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्यात येत आहे. ज्या संस्थांची नावे आली नाही, त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नावे समाविष्ट करण्याची विनंती करण्यात आली आहे. रावसाहेब वप्रे, कार्यकारी संचालक, जिल्हा सहकारी बँक, नगर

अंमलबजावणीसंदर्भात उद्या बठक

कर्जमाफीच्या अंमलबजावणीसंदर्भात ज्या अडचणी येत आहेत, त्या संदर्भात चर्चा करून मार्ग काढला जात आहे. ज्या संस्थांची नावे ऑनलाइन अर्ज भरताना संगणक प्रणालीमध्ये आली नाही, त्यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग दुरुस्ती करणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही नावे सहकार खात्याकडे व माहिती तंत्रज्ञान विभागाकडे आल्यानंतर समाविष्ट केली जातील. तसेच ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या समस्या व प्रश्नांवर मार्ग काढण्यात येईल. पुणे येथे आज शनिवार, दि. १९ रोजी पुणे जिल्हा बँकेच्या सभागृहात बठक आयोजित केली असून सहकार सचिव संधु व सहकार आयुक्त विजय झाडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.  दिगंबर हौसारे, विभागीय निबंधक, सहकार खाते, नाशिक विभाग